आता आई कुणा म्हणू मी! तीन चिमुकल्यांना पडला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 09:38 PM2021-11-18T21:38:07+5:302021-11-18T21:38:32+5:30
Wardha News दोन जुळी व अडीच वर्षाच्या मुलीला पोरके करून त्यांच्या मातेने जगाचा निरोप घेतल्याची मनाला हळहळ लावणारी घटना वर्धा येथे घडली.
वर्धा : आईची माया विकत घेता येत नाही आणि ती कोणी देऊही शकत नाही, असाच प्रसंग सध्या आंजी येथील तीन चिमुकल्यांवर ओढवला आहे. अडीच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी मुलगा आणि मुलगी, अशा जुळ्यांना जन्म दिल्यानंतर माउलीची अचानक प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे परिवाराला मोठा धक्का बसला असून ‘आता आई कुणा म्हणू मी! आई घरी ना दारी...’ अशी म्हणण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे.
आंजी येथील रहिवासी प्रशांत जोशी यांचा तीन वर्षांपूर्वी यवतमाळ येथील हर्षा नामक मुलीशी विवाह झाला. प्रशांत, हर्षा आणि प्रशांत यांची वृद्ध दिव्यांग आई, असा तिघांचाच परिवार आहे. त्यांच्याकडे थोडी शेती असून ते पुजारी आहेत. अडीच वर्षांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्यानंतर त्यांच्या परिवारात एक चैतन्य निर्माण झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना दरम्यानच्या काळात हर्षाला प्रकृतीचा त्रास जाणवायला लागला. अशातच तिला गर्भधारणा झाल्याने यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु जुळे मुले असल्याने डॉक्टरांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हर्षाला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सर्व उपचार केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी तिने मुलगा- मुलगी, अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला; पण प्रकृती खालावल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. बाळांची प्रकृती ठणठणीत असून, तिच्याही प्रकृतीत सुधारणा होत होती. बुधवारी अचानक प्रकृती खालावली आणि रात्रीच्या सुमारास तिने जगाचा निरोप घेतला. या घटनेने जोशी परिवाराला मोठा धक्का बसला असून, आता दोन चिमुकल्या जुळ्यांसह अडीच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. दोन चिमुकल्यांना आईचा नीट चेहराही लक्षात नसताना नियतीने हिरावून घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
‘त्या’ चिमुकल्यांचे काय?
हर्षा यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयातून बाळांनाही सुटी देण्यात आली असून, सध्या ते परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. गुरुवारी दुपारी साश्रुनयनांनी हर्षाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होता. तो म्हणजे ‘त्या’ चिमुकल्यांचे काय? हा प्रश्न परिवारासह नातेवाइकांनाही पडला आहे. परिवारातील सदस्य आणि नातेवाईक या चिमुकल्यांचा सांभाळ करीत आहेत.