न.प. मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आठवडी बाजारातील समस्यांचा आढावा
By admin | Published: July 22, 2016 01:51 AM2016-07-22T01:51:57+5:302016-07-22T01:51:57+5:30
शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यात असून आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य आहे.
वृत्ताची दखल : चिखल, घाण पाहून अधिकारीही अवाक्
हिंगणघाट : शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यात असून आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत बुधवारी न.प. मुख्याधिकाऱ्यांनी आठवडी बाजार परिसराची पाहणी करीत समस्यांचा आढावा घेतला. यावेळी व्यापारी व ग्राहकांनी त्यांच्यापूढे समस्यांचा पाढा वाचला.
न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी आठवडी बाजार आणि भाजी बाजाराला बुधवारी भेट देत पाहणी केली. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाहीही दिली. शहरातील खड्डे, चिखल व घाणीचे साम्राज्य याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. यातून नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावरून न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप व आपचे मनोज रूपारेल यांनी बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. आठवडी बाजारातील चिखल, घाण, अस्वच्छतेची तसेच प्राथमिक सुविधा नसल्याचे लक्षात आणून दिले. अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरण निदर्शनास आल्यानंतर लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले.
श्रीराम टॉकीज ते अभ्यंकर शाळा मार्गावर भाजी बाजाराचे अतिक्रमण झाल्याने जुन्या वस्तीतील ६ वॉर्डातील नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. हा हा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. याप्रसंगी नागरिक, व्यापारी व तक्रारदार उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)