न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा
By admin | Published: May 11, 2017 12:46 AM2017-05-11T00:46:24+5:302017-05-11T00:46:24+5:30
स्थानिक नगर पालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या नियमांना डावलून काम घेतल्या जात आहे.
नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक नगर पालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या नियमांना डावलून काम घेतल्या जात आहे. आठ-आठ तास अधीक स्वच्छता कर्मचाऱ्यांना घाणीत राहून काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने वर्धा न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातून, वर्धा नगर पालिकेमधील सफाई कामगारांकडून आठ तास जास्तीचे कामे करून घेतल्या जात आहे. ते सतत घाणिच्या संपर्कात राहत असल्याने त्यांना मलेरीया, डेंग्यू, टि.बी., हिवताप आदी विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जास्तीच्या कामाचा बोझा सफाई कामगारांवर लादल्या जात आहे. पागे समितीच्या शिफारशीनुसारच सफाई कामगारांकडून कामे घेणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामे घेताना अधिकाऱ्यांकडून दाट दपट केले जात असून हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या निकाली काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलन करीत बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांसह नगर विकास मंत्रालयासह आदींना पाठविण्यात आले आहे. न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रमेश मोगरे, रवी माकरे, उमेश समुद्रे, दीपक ब्राह्मणे, गोपी व्यास, विनोद तांबेकर आदींची उपस्थिती होती.
आठ तास जादा घेतले जाते काम
वर्धा न.प.तील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दाट दपट करून आठ-आठ तास अधिकचे काम करून घेतले जात आहे. सदर प्रकारामुळे त्यांच्या आरोग्य धोक्यात आले असून योग्य कार्यवाहीची मागणी आहे.