न.प. शिक्षक, कर्मचाऱ्यांचा खासदारांनी घेतला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:53 PM2019-06-15T23:53:53+5:302019-06-15T23:54:38+5:30
स्थानिक न.प.शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना शिस्तीत राहण्याचे बाळकडू पाजले. यावेळी न.प.शाळेचा वर्ग दहावीचा खालावलेला निकाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमाजी पणाचा आढावा घेऊन वेळीच सुधार होण्यासाठी धडे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक न.प.शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना शिस्तीत राहण्याचे बाळकडू पाजले. यावेळी न.प.शाळेचा वर्ग दहावीचा खालावलेला निकाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमाजी पणाचा आढावा घेऊन वेळीच सुधार होण्यासाठी धडे देण्यात आले.
न. प. सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून खासदार रामदास तडस व अतिथी म्हणून न. प. गटनेता शोभा तडस, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे तसेच नगरसेविका कल्पना ढोक, सारिका लाकडे, संध्या कारोटकर, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे व विजय गोमासे यांची उपस्थिती होती. न.प.सभागृहात खासदार रामदास तडस यांचा सत्कार व न.प.कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक यांची आढावा बैठक असा दुहेरी कार्यक्रम आयोजित होता. सर्वप्रथम न.प. माध्यमिक-प्राथमिक शाळेचे शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने खासदार तडस यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर आढावा बैठक घेऊन उपस्थित कर्मचारी व शिक्षकांच्या कामासंबंधी माहिती जाणून घेण्यात आली.
पालिकेच्या माध्यमिक शाळेतील दहावीच्या ३७ टक्क्यांपर्यंत खालावलेल्या निकालाबाबत मंथन करण्यात आले. शिक्षकांचा वेळकाढूपणा व मनमानी कारभार याला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. कर्मचाºयांवर कुणाचाही वचक राहिला नसल्याने त्यांची नेहमीची उपस्थिती नगण्य ठरली आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाºया नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब उपस्थित नगरसेवकांनी खासदार तडस यांच्या लक्षात आणून दिली. शिक्षक भरतीअभावी विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान, प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्याची गैरव्यवस्था, पतंप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना उर्वरित पैशाचे वाटप तसेच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी, कार्यालयीन कर्मचाºयांची भरती तसेच प्राथमिक शाळांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी नवीन बालवाड्या सुरू करण्याबाबत बैठकीत विचार-विनिमय करण्यात आला.
शैक्षणिक कार्यात व कार्यालयीन कामकाजातील दिरंगाई खपवून न घेता प्रशासकीय वचक ठेवण्यात यावा, कुणाचेही भय न ठेवता कारवाईचा बडगा उगारण्यात यावा असे विचार खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त करून कर्मचाºयांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा केली. यावेळी न. प. माध्यमिक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक शाळेचे शिक्षक, न.प.कार्यालयीन कर्मचारी व विविध विभागातील कर्मचाºयांची उपस्थिती होती.