न.प. सभापतीची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 08:54 PM2019-01-02T20:54:55+5:302019-01-02T20:56:37+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी विशेष सभा पार पडली. यावेळी न.प. सभापतींसह स्थायी समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी उत्तम दिघे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी विशेष सभा पार पडली. यावेळी न.प. सभापतींसह स्थायी समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी उत्तम दिघे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर निवड प्रक्रियेदरम्यान बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक रवींद्र गोसावी, शिक्षण सभापती म्हणून नगरसेविका अर्चना आगे, स्वच्छता सभापती इंदू तलमले, पाणी पुरवठा सचिन पारधे, महिला व बालकल्याण वंदना भूते, उपसभापती सुमित्रा कोपरे तर नियोजन सभापती म्हणून न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर यांची बहूमताने निवड करण्यात आली. शिवाय स्थायी समिती सदस्य म्हणून प्रदीप ठाकरे, आशीष वैद्य व सोनल ठाकरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, नगरसेविका त्रिवेणी कुत्तरमारे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती होती.
गणपूर्तीअभावी सभा रद्द; १४ नगरसेवकांची दांडी
सिंदी (रेल्वे) : येथील न.प.च्या सभागृहात न.प. सभापतीच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. परंतु, १७ पैकी १४ नगरसेवक गैरहजर राहल्याने सभा रद्द करण्यात आल्याचे मुख्याधिकारी रवींद्र ढाले यांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी झालेल्या न.प.च्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षा तसेच आठ नगरसेवक, काँग्रेसचे सहा नगरसेवक, राकाँचे दोन, अपक्ष एक असे १७ नगरसेवक निवडून आले होते. सत्ता स्थापनेसाठी आमदार समीर कुणावार, भाजपाचे अशोक जोशी व ओम राठी यांनी ८ भाजपा व ४ काँग्रेस (आशीष देवतळे गटाचे) व १ अपक्ष अशी युती केली. सोबतच ठरल्याप्रमाणे दरवर्षी दोन समित्या काँग्रेसला द्यायच्या असे ठरले होते. मात्र, मागील एक वर्षांपासून भाजपा नगराध्यक्षा संगीता शेंडे व काँग्रेसचे गटनेते आशीष देवतळे यांच्यात काही कारणावरून ओढातानी वाढत गेली. काल झालेल्या भाजपाच्या बैठकीत काँग्रेसला समित्या द्यायच्या नाही असे ठरले, असे भाजपा नेत्याने गुप्त पणे सांगितले. तर काही भाजपा नगरसेवकांचे म्हणणे होते की ठरल्याप्रमाणे त्यांना दोन नाही तर एक तरी समिती द्यायची अशी चर्चा चालू होती. यावर शेवटपर्यंत निर्णय न झाल्याने आज सभापती निवडीच्या दिवशी काँग्रेसचे (देवतळे गटाचे) ४, राष्ट्रवादीचे २, अपक्ष १ व भाजपाचे ७ नगरसेवक तसेच दोन स्विकृत सदस्य सभेला गैरहजर होते. ११ वाजता बोलविण्यात आलेल्या बैठकीला १ वाजेपर्यंत प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, संख्या कमी राहिल्याने सभा रद्द करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्यासह मुख्याधिकारी रवींद्र ढाले यांची उपस्थिती होती. नगरसेवकांच्या दांडीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
देवळीत सर्व सभापतीपद भाजपाकडे
देवळी : स्थानिक न.प. विषय समिती सभापती पदाची निवडणूक चुरशीची ठरली. निवडणुकी दरम्यान शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आरोग्य व महिला व बालकल्याण आदी सभापती पदासाठी सत्तारूढ व काँग्रेसच्यावतीने नामांकन दाखल झाले होते; पण, न.प.त भाजपाचे बहुमत असल्याने या चारही सभापती पदासाठी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी काँग्रेसच्या राजश्री देशमुख यांची वर्णी लागली. शिक्षण सभापती म्हणून नंदकिशोर वैद्य, बांधकाम सभापती मारोती मरघाडे, आरोग्य सभापती मिलिंद ठाकरे तर महिला व बालकल्याण सभापती पदावर संगीता तराळे यांची बहूमताने निवड करण्यात आली. पाणी पुरवठा सभापती पद न.प.उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांच्याकडे देण्यात आले. शिक्षण समिती सदस्य म्हणून कल्पना ढोक, शोभा तडस, पवन महाजन, बांधकाम समिती सदस्यपदी सारीका लाकडे, संध्या कारोटकर, गौतम पोपटकर, आरोग्य समिती सदस्य म्हणून सुनीता बकाणे, सारीका लाकडे, अश्विनी कामडी व महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी सुनीता ताडाम व कल्पना ढोक यांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविण नहिरे यांनी काम पाहिले.
न.प. सभापतीची निवडणूक शांततेत
पुलगाव : आज न.प. पुलगाव येथे स्थायी समिती सभापतीची निवडणूक पार पाडली. यात स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून माधुरी इंगळे, बांधकाम सभापतीपदी सोनाली काळे, पाणी पुरवठा सभापती पूनम सावरकर, शिक्षण सभापती म्हणून न.प. उपाध्यक्ष आशीष गांधी, महिला व बाल कल्याण सभापती चंद्रकला डोईफोडे तसेच महिला व बालकल्याण उपसभापती म्हणून चम्पा सिद्धानी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांनी काम पाहिले. याप्रसंगी न.प. मुख्याधिकारी प्रशांतजी उरकुडे आदींची उपस्थिती होती. नवविर्वाचित सभापतींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शितल गाते, मंगेश झाडे, राजीव जैसवाल, ममता बडगे, गौरव दांडेकर, नारायण भेंडारकर, जयभारत कांबळे, श्रवण तिवारी, मधुकर रेवतकर, पवन व्यास आदींची उपस्थिती होती.
कोरम अपूर्ण; सभा तहकुब
हिंगणघाट : येथील नगरपालिकेच्या विविध विषय समितीची निवडणूक सभा आज कोरम अभावी तहकुब करण्यात आली. नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता असली तरी दावे-प्रतिदावे तेवढेच आहे. यात एकमत न झाल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी आजच्या सभेला दांडी मारली. परिणामी कोरम अभावी सभा तहकूब करावी लागली. सभेला पिठासीन अधिकारी म्हणून उपवीभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत तर न.प. मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते हजर होते.