जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:09+5:30

जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी.

The number of corona tests should be increased in the district | जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी

Next
ठळक मुद्देसंजीवकुमार : उपाययोजनांचा घेतला आढावा, लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने कोरोना तपासणी करण्याबाबत दिलेत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, वास व चव न समजणे, श्वास घेण्यास त्रास, डायरिया आणि एन्फ्लुएन्झा सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अधिकाधिक चाचण्या झाल्यास प्राथमिक अवस्थेत रुग्णांचा शोध लागून लवकर उपचार होतील आणि त्यांच्या माध्यमातून होणारा रोगाचा प्रसार थांबविता येईल, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी दिल्या.
जिल्हा परिषद सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्यात राबविलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध प्राथमिक अवस्थेत होऊन त्यांच्यावर लवकर उपचार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्वेक्षणाचा दररोज आढावा घेण्यात यावा. रोज गाव-वॉर्डनिहाय तपासण्यात आलेल्या रुग्णांची यादी करून त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. यासोबतच गावागावात हॅण्डवॉश स्टेशन तयार करावेत, तेथे पुढील तीन महिने हॅण्डवॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाºया व्यक्तींवर कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही आवश्यक असून त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्यात.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सर्व तहसीलदार, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

कामगिरीबद्दल अधिकाऱ्यांना कौतुकाची थाप
वर्धा जिल्ह्याने कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. याबाबत त्यांचे कौतुक करून शाबासकी दिली. जिल्ह्याने आतापर्यंत केलेले काम उल्लेखनीय आहे. मात्र, आता यापुढे जिल्हाबंदी उठल्यानंतर, परिवहन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे संजीवकुमार म्हणाले.

Web Title: The number of corona tests should be increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.