२५ झाला कोविड बाधितांचा आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:17+5:30
रेल्वे विभागात काम करणारा व सिंदी रेल्वे येथील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदी रेल्वे येथील कोविड बाधित आणि वर्धा शहरातील रामनगर भागातील रहिवासी असलेला व्यक्ती हे दोघेही रेल्वे विभागात कामावर होते. अशातच रामनगर येथील व्यक्ती सिंदी रेल्वे येथील कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशीत पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मंगळवारी तीन नव्या कोविड बाधित सापडल्याने कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २५ झाला आहे. यात बहूतांश जिल्ह्याबाहेरील व्यक्ती असून नवीन रुग्णामध्ये वर्धा शहरातील रामनगर भागातील एक ५९ वर्षीय पुरूष, आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील एक ४५ वर्षीय महिला व २१ वर्षीय मुलीचा समावेश आहे. वर्धा शहराचे हृदयस्थान असलेल्या रामनगर भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रेल्वे विभागात काम करणारा व सिंदी रेल्वे येथील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदी रेल्वे येथील कोविड बाधित आणि वर्धा शहरातील रामनगर भागातील रहिवासी असलेला व्यक्ती हे दोघेही रेल्वे विभागात कामावर होते. अशातच रामनगर येथील व्यक्ती सिंदी रेल्वे येथील कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशीत पुढे आले आहे.
तर आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील ५९ वर्षीय पुरुषाचा यापूर्वी अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला होता. याच रुग्णाच्या निकट संपर्कात आलेली त्याची २१ वर्षीय मुलगी आणि ४५ वर्षीय पत्नीचा अहवाल आता कोविड पॉझिटिव्ह आला आहे. सदर तिन्ही नवीन कोरोना बाधितांना तातडीने कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शिवाय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पाच व्यक्ती जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात
वर्धा शहरातील रामनगर भागात आढळलेल्या कोविड बाधिताच्या कुटुंबातील पाच व्यक्तींना आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाईन केले आहे. शिवाय त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
१५ व्यक्ती झाले कोरोनामुक्त
वर्धा जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २५ कोरोना बाधितांची नोंद घेतली असली तरी त्यात बहूतांश कोविड बाधित जिल्ह्याबाहेरील आहेत. २५ पैकी तिघांचा मृत्यू झाला असून १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
औषधांची फवारणी सुरू
भगतसिंग चौक परिसरात न.प.च्या कर्मचाऱ्यांकडून औषधांची फवारणी करून परिसर निर्जंतूक केला जात आहे.
आरोग्य चमूकडून सर्वेक्षण सुरू
वर्धा शहरातील रामनगर भगतसिंग चौक भागात कंटेन्मेंट व बफर झोन तयार करून परिसर सील करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर आरोग्य विभागाच्या चमूूंकडून गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप व घसादुखीचा त्रास आहे काय याबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे.
क्लस्टर कंटेन्मेंंट कृती योजना कार्यान्वित
रामनगर भागातील भगतसिंग चौक परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने या परिसरात क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना लागू करून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. कोविड रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, न.प.चे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी बोरकर आदींनी सदर परिसर गाठून पाहणी केली.
निकट संपर्कातील व्यक्तींचा घेतला जातोय शोध
रामनगर येथील रहिवासी असलेल्या कोविड बाधिताच्या निकट संपर्कात कोण कोण व्यक्ती आलेत याचा शोध सध्या महसूल, आरोग्य व पोलीस विभागाकडून घेतल्या जात आहे.