वर्ध्यात इंजेक्शनच्या बाधेने नर्सिंगची विद्यार्थिनी दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:07 AM2018-11-05T07:07:37+5:302018-11-05T07:07:49+5:30
सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला.
वर्धा : सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. उपचारानंतर ९ विद्यार्थिनींना सोडण्यात आले.
रुग्णालयात विद्यार्थ्यांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर दहा विद्यार्थिनींना रिअॅक्शन आली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. बीएस सी. च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या हिमानी रवींद्र मलोंडे (१९, रा. देवळी,) हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. शुक्रवारपासून नातेवाईकांसह विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या मांडला होता.
इंजेक्शनमध्ये सापडल्या अळ्या
सोलापूरच्या सहकारी रुग्णालयातील भांडारातून घेतलेल्या इंजेक्शनमध्ये अळ्या आढळून आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनानेही भांडारातील औषधांची तपासणी केली़
पृथ्वीराज चव्हाण (२ वर्षे) यास तीन दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकला असल्याने रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी डॉक्टरांनी लिहून दिलेले दोन इंजेक्शन आणले. दुसरे इंजेक्शन देत असताना नातेवाईकांना त्यात अळ्या दिसल्या. नर्स व डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे नातेवाईकांनी थेट जेलरोड पोलीस ठाणे गाठले. मुलाचे काका शंकरराव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
हिमानीची प्रकृती बिघडल्याची माहिती तिच्या मैत्रिणींंकडून मिळाली. औषधामध्ये दोष असू शकतो. प्रकरणाची सखोल चौकशी करुन न्याय द्यावा, अशी मागणी हिमानीचे वडील रवींद्र मलोंडे यांनी केली.
रुग्णालयात काम करणाºया डॉक्टर, नर्सेसना संक्रमण होऊ नये म्हणून ‘हेपिटायटीस बी’चे इंजेक्शन दिले जाते. लाखात एखाद्या व्यक्तीबाबत, अशी घटना घडते. त्याबाबच रुग्णालयाची प्रशासकीय समिती चौकशी करत आहे. सर्व प्रकारच्या चौकशीला सहकार्य करू.
- अभ्युदय मेघे, प्रशासकीय अधिकारी, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी