व्याजाच्या वादात ७६० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:32 PM2018-04-22T23:32:15+5:302018-04-22T23:32:15+5:30
शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
रुपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून ७६० कोटी रुपये करण्यात आले आहे. या व्याजाच्या वादाने यंदा कर्जवाटप प्रभावित होण्याची शक्यता आहे.
गत खरीप हंगामात जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७३० कोटी रुपये होते. याच काळात कर्जमाफीची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज घेण्याकडे पाठ केली. परिणामी जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ ४० टक्क्यावर राहिले. या नव्या हंगामातही अशीच स्थिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बँकेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे त्यांना नवे कर्ज मिळणार आहे. तर सातबारावर कर्जाचा बोझा कायम असलेल्या शेतकऱ्यांना तर नियमानुसार कर्ज मिळणे शक्य नसल्न्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे व्याजाच्या रकमेबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
बँकांनी कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारू नये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. बँकांनी त्यांची ही घोषणा अमान्य करीत व्याज आकारणी कायम ठेवली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा अध्याप कोरा झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नव्या कर्जातून व्याज कपातीचा जिल्हाधिकाºयांचा प्रस्ताव
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज वाढत गेले. जोपर्यंत शेतकरी ही रक्कम भरणार नाही तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. आणि सातबारा कोरा झाल्याशिवाय बँका कर्ज देणार नाही अशी स्थिती असल्याने यावर मार्ग काढण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नव्या कर्जातून जुन्या कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करावी असा प्रस्ताव ठेवला. यावर बँका सध्या चुप्पी साधून असल्याने दिसते. शिवाय शेतकरीही याबाबत शांत आहेत.
शेतकऱ्यांकडून रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष
कर्जमाफी झाल्यानंतर तिची रक्कम खात्यात जमा करण्याला विलंब झाला. यामुळे कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले. ही रक्कम माफ होण्याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. यामुळे त्यांचे रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही रक्कम शासन देईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. तसे होण्याची शाश्वती नसल्याने सातबारा कोरा होणे सध्यातरी शक्य नसल्याचे दिसते.
हंगाम तोंडावर
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. असे असताना व्याजाच्या रकमेचा घोळ कायम असल्याने कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोझा कायम आहे. आता शेतकऱ्यांकडून नव्या कर्जाकरिता बँकेत जाणे आता सुरू होईल. यामुळे यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.