वर्धा नदीच्या स्वच्छतेकडे डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:52 PM2018-08-04T23:52:49+5:302018-08-04T23:53:42+5:30
जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाºया जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे लहान डबके साचलेले आहेत.
प्रभाकर शहाकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाऱ्या जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे लहान डबके साचलेले आहेत. देशात नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात असताना वर्धा नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी वर्धा नदी पावसाळ्यात ठणठणीत कोरडी आहे. पात्रातील खड्ड्यांत जे काही थोडं पाणी आहे तेही घाण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाने देशातील पवित्र नद्यांची स्वच्छता मोहीम राबवून नद्यांचे जलशुद्धीकरण केले. परंतु चार जिल्ह्यातून वाहात जावून गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या धार्मिक स्थळी वैनंगगेत विलीन होणारी वर्धा नदी मात्र केंद्र व राज्य शासनाकडून उपेक्षितच राहिली आहे.
नदी पात्रात जलपर्णी लव्हाळ व घाण पाण्याची डबकी साचल्याने धार्मिक पर्वात मूर्ती विसर्जन करताना भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नदीतील घाण पाण्याची व नैसर्गिक क्रियेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे विविध प्रकारच्या रोगांचाही प्रादुर्भाव होत आहे.
नगर प्रशासनाने शहरातील सामाजिक संघटनांचा सहकार्य घेवून या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी शहरात आलेले पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळ यांनी आपल्या पोलीस मित्रांच्या व शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्धा नदीच्या पात्रात स्वच्छता मोहिम राबवून सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. तसाच भगीरथ पुन्हा समोर येण्याची प्रतिक्षा शहरवासी करीत आहे.
मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्याच्या मुलताई येथून उगम पाऊन दक्षिण वाहिनी ठरलेली वर्धा नदी काठच्या परिसर म्हणजे एकेकाळी नैसर्गिक सौदर्य ठरायचा. परंतु नदीकाठी असणारे घाट, माती, झाडे, झुडपांनी व्यापलेली आहे. पूर्वी पालकवाडी म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्ह्याला वर्धा हे नाव मिळाले ते या नदीमुळेच. इंग्रजांनी बांधलेल्या रेल्वे पुलामुळेच पुलगाव म्हणजे ब्रीज टाईन पुलाचे गाव असा उल्लेख आढळतो. या नदीने जिल्ह्याला नाव दिले. तिला उपेक्षित ठेवण्यात येत आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.