जात, धर्म, प्रांतवाद विकासात अडथळा
By admin | Published: December 29, 2014 11:50 PM2014-12-29T23:50:38+5:302014-12-29T23:50:38+5:30
भारतीय संस्कृती महान आहे. मात्र सध्या डोके वर काढत असलेल्या जात, धर्म, प्रांत आणि भाषावादाला तिलांजली दिल्याशिवाय भारत हा महाशक्ती होणे अशक्य आहे, असे विचार आ.अमर काळे
अमर काळे : सर्व संत स्मृती सप्ताहात प्रबोधनात्मक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
कारंजा (घा.) : भारतीय संस्कृती महान आहे. मात्र सध्या डोके वर काढत असलेल्या जात, धर्म, प्रांत आणि भाषावादाला तिलांजली दिल्याशिवाय भारत हा महाशक्ती होणे अशक्य आहे, असे विचार आ.अमर काळे यांनी मांडले. राष्ट्रसंताच्या विचारांची आणि ग्रामगीतेची आज समाजाला गरज आहे. प्रत्येकाने लग्नप्रसंगी ग्रामगीता भेट दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी त्यांनी यावेळी केले.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने राष्ट्रसंंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संताजी जगनाडे यासह विविध संतांचा जयंती व पूण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काळे, सरपंच नितीन दर्यापूरकर, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश कठाणे उपस्थित होते.
सात दिवसीय कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक व प्रबोधन कार्यक्रमांची रेलचेल होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. सप्ताहात विलासपंत कोरडे याचे ‘संगीतमय भागवत प्रवचन’ झाले. यासह सामुहिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान आणि ग्रामसफाई असे उपक्रम राबविण्यात आले. दररोज विविध भजन मंडळाने कार्यक्रम सादर केले. गुरुदेव कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. सावंगी (मेघे)े येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी रोगनिदान शिबिरात ३५० रुग्णांनी तपासणी केली. यात नेत्र, रक्त, दंतरोग, वातविकार याची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. राष्ट्रसंत भजन स्पर्धेत ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुलांच्या गटात प्रथम क्रमांक गौरव नासरे, द्वितीय देवेंद्र ठोंबरे यांनी मिळविले. महिला गटात प्रथम भारती कामडी, द्वितीय नलीनी मेश्राम तर तृतीय मंदा चोपडे या मानकरी ठरल्या. प्रास्ताविक राजीव पालीवाल यांनी केले. संचालन शुभांगी नासरे यांनी केले तर आभार बाबाराव बारई यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ सेवक महादेवराव भीलकर, कृष्ण लोखंडे, अमृत खोडे, नाना घागरे, पंजाब जसुतकर, कीर्तनकार कोरडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)