मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण

By admin | Published: November 8, 2016 01:40 AM2016-11-08T01:40:28+5:302016-11-08T01:40:28+5:30

राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने जिल्ह्यात शासकीय गोदामातील हमालांनी सोमवारपासून पाठबंद-

Offering Shrifal to the District Collector for the demands | मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण

मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण

Next

हमाल मापाडी महामंडळाचे आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूजा
वर्धा : राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने जिल्ह्यात शासकीय गोदामातील हमालांनी सोमवारपासून पाठबंद-कामबंद आंदोलन पुकारले आहे. विविध मागण्यांना मंजुरी देण्याकरिता आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तिथे पूजा केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण करून मागण्या पूर्ण करण्याकरिता साकडे घातले.
या मागण्यांच्या पूर्ततेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शासकीय गोदामात कार्यरत असलेले हमाल सहभागी झाले असल्याने गोदामात धान्यसाठा घेवून आलेल्या ट्रकांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले. मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनानुसार, शासकीय गोदामातील कामगारांच्या मुळ वेतनातून एकूण ४० टक्के रक्कमेची कपात करण्यात येत आहे. तसेच त्यांना वेळीच वेतन मिळत नसल्याने हमालांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. यामुळे होत असलेली कपात कमी करून वेतन महिन्याच्या १० तारखेच्या आत ते देण्यात यावे अशी मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली.
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी अधिनियम १९६९ व त्यानुसार शासनाने विधियुक्त केलेल्या योजनेची वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामात अंमलबजावणी सुरू आहे. याच अधिनियमाप्रमाणे कामगारांना मूळ मजुरी व त्यावर ३० टक्के रकमेची कपात केली जाते. तसेच दरमहा वेतन मिळत नाही. विशेष म्हणजे मुख्य नियोक्ता म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी माथाडी मंडळात नोंदीत आहे. यासंबंधी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभागाने २००३ ते २०१६ या कालावधीत वेळोवेळी आदेश व सूचना केलेल्या आहेत.
याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतन व लेव्हीसंबंधी आदेश दिले आहेत. तरीही कामगारांच्या वेतनातून एकूण ३० टक्के रक्कमेची कपात सुरू असल्याचा आरोप करीत कामगारांच्या मूळ वेतनातील तीस टक्के रक्कमेची कपात बंद करावी, कामगारांचे दरमहा वेतन १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या आंदोलनात आंदोलनात डॉ. हरिष धुरटे, वसंत भागडकर, श्रीराम केवट, खुशाल तुपट, श्रीकृष्ण कैकाडी, दत्तु दुरगुडे, अनिल धोत्रे, किशोर मारबते, गणेश मुते, गंगाधर लांबट यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)

मोर्चातून नोंदविला निषेध
४शासकीय गोदामातील कामगारांनी आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला प्रसन्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पूजा करून पुष्प व श्रीफळ अर्पण केले. तसेच आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या दिला. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे सहाय्यक लेखाधिकारी रामराव चव्हाण यांनी आंदोलन मंडपाला भेट देत आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

गोदामासमोर लागल्या वाहनांच्या रांगा
४शासकीय गोदामातील सर्वच भारवाहकांनी पाठबंद-कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शासकीय गोदामातील कामकाज ठप्प असल्याचे दिसून आले. येथील एफसीआय गोदामातून शहरातील गांधी पुतळ्याजवळील शासकीय गोदामात ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात धान्यसाठा येतो. सर्व कामगार आंदोलनात सहभागी झाल्याने धान्याचे पोते असलेले ट्रक आज तसेच उभे असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, वर्धेच्या शासकीय गोदामासमोर शासकीय धान्यसाठा भरलेल्या मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शासकीय गोदामातील कामगारांच्या वेतनातून १० टक्के पीएफ व ३० टक्के लेव्ही अशी एकूण ४० टक्क्याची कपात करण्यात येत आहे. ही कपात बंद करून शासनाने ती रक्कम भरावी, अशी आमची मागणी आहे. जेव्हापासून ही मागणी आम्ही करीत आहो तेव्हापासून पाच जिल्हाधिकारी झालेत; परंतु, कामगारांची समस्या जैसे थेच असून या मागणीकडे पाचही जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
डॉ. हरिष धुरट, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ.

Web Title: Offering Shrifal to the District Collector for the demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.