संपामुळे कार्यालयांचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:47 AM2018-08-08T00:47:39+5:302018-08-08T00:48:07+5:30
राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय राज्यव्यापी संप करण्यात आला. या संपाचा तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांवरही चांगला परिणाम झाला. अनेक कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज पूर्णपणे खोळंबले. जिल्ह्याच्या आठ पैकी समुद्रपूर तालुक्यात कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय राज्यव्यापी संप करण्यात आला. या संपाचा तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांवरही चांगला परिणाम झाला. अनेक कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज पूर्णपणे खोळंबले. जिल्ह्याच्या आठ पैकी समुद्रपूर तालुक्यात कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे दिसून आले. तालुकास्तरावर बुधवार, गुरूवारला धरणे आंदोलन करण्यात आले.
समुद्रपूर येथे राज्य कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून पाठींबा दर्शविला. यावेळी गटविकास अधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी अध्यक्ष नरेंद्र जामुनकर, सचिव प्रविण बालामवार आदींसह पन्नासवर अधिक शासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
वर्धा येथे ठाकरे मार्केट परिसरातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी संजय ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला एच.एम. लोखंडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव विजय कोंबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, माध्यमिक शिक्षक परिषदेचे अजय वानखेडे, खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे सुरेशकुमार बरे यांनी मार्गदर्शन केले. कर्मचाºयांना संप का करावा लागत आहे. राज्यशासनाची कर्मचारीविरोधी भूमिका आदींवर त्यांनी भाषणातून प्रकाश टाला. तत्पूर्वी सकाळी महादेवराव ठाकरे यांच्या पुतळ्याला हारार्पण करून हा मोर्चा बजाज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंचायत समिती कार्यालय मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या आंदोलनात जिल्हा परिषद महासंघ, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, वर्धा जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषद, केंद्र प्रमुख संघटना, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, विदर्भ अशासकीय माध्यमिक कर्मचारी संघटना, जिल्हा समन्वयक समिती आदी सहभागी झाले आहे. आंदोलकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन यापूर्वी शासनाला देण्यात आले आहे.
या निवेदनात सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार तत्काळ लागू करा. तसेच जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्याची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासून वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेसह मंजूर करावा. अशंदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची परिभाषिक पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावे. सर्व नोंदणीपटावर असलेल्या अर्जधारकांना एकवेळची बाब म्हणून अनुकंप तत्त्वावर नियुक्त्या देण्यात याव्या. शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करण्यात यावे. निवृत्तीचे वय ६० वर्षे व ५ दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील आंदोलनात मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एच.एम. लोखंडे, कोषाध्यक्ष बाबाराव भोयर, कार्याध्यक्ष नितीन तराळे, सरचिटणीस विनोद भालतडक, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे प्रांतिय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, मार्गदर्शक पांडुरंग भालशंकर, जिल्हाध्यक्ष राजु चंदनखेडे, कार्यावाह महेंद्र सालंकार, उपाध्यक्ष मंदा चौधरी, प्रविण देशमुख आदी सहभागी झाले होते. बुधवारी धरणे आंदोलन होणार आहे.
पुलगावात संपास संमिश्र प्रतिसाद
पुलगाव - राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना यांनी सातव्या वेतन आयोग महागाई भत्त्याची थकीत राशी व इतर काही मागण्यासाठीपुकारलेल्या संपात शहरातील शाळा महाविद्यालय नगर परिषद, शासकीय कार्यालयीन कर्मचाºयांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील जवळपास सर्वच शाळाचे कामकाज सुरळीत सुरू असले तरी शहरातील सर्वात मोठी आर.के. हायस्कूल येथील सात आठ शिक्षकांनी किरकोळ रजेचा अर्ज देवून सुट्टी घेतली. आदर्श हायस्कूल येथील एकूण २२ पैकी १३ हायस्कूल शिक्षक संपात सहभागी झाले असले तरी शाळा सुरु असल्याचे प्राचार्या कडून सांगण्यात आले. सेंट जॉन हायस्कूल क्रिष्णा तायल स्कूल येथील एकही शिक्षक संपात सहभागी नसून ज्ञानभारती विद्यालय व नगर परिषद हायस्कूल नियमित पणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. नगर परिषदचे सर्वच कर्मचारी आज सेवेत असल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली. एकंदरीत शहरात या तीन दिवशीय संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला.