१६ मंडळांकडेच अधिकृत वीज मीटर
By admin | Published: September 11, 2016 12:36 AM2016-09-11T00:36:45+5:302016-09-11T00:36:45+5:30
गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले होते; पण गणेश मंडळांनी महावितरणला ठेंगाच दाखविला आहे.
महावितरणलाच शॉक : अनधिकृत जोडण्यांवरच गणेशोत्सवातील रोषणाई
प्रशांत हेलोंडे वर्धा
गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले होते; पण गणेश मंडळांनी महावितरणला ठेंगाच दाखविला आहे. जिल्ह्यात तब्बल २०४ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. असे असताना आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ गणेश मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे उर्वरित मंडळांचा गणेशोत्सव अनधिकृत वीज जोडणीवरच साजरा होताना दिसतो.
वर्धा जिल्ह्यात २०४ सार्वजनिक गणेश मंडळे असल्याची नोंदणी पोलिसांकडे झाली आहे. या व्यतिरिक्त लहान-मोठे अनेक मंडळे आहेत. या मंडळांची नोंदणी झालेली नसल्याचेच दिसते. यामुळे गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी आणि देखावे लक्षात घेता अनधिकृत वीज जोडणी वेळप्रसंगी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. जिल्ह्यातील कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडे कायम वीज जोडणी असण्याची शक्यता आहे. असे असले तरी अनेक गणेश मंडळांद्वारे जवळच्या महावितरणच्या खांबांवरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेतली जात असल्याचेच दिसते.
शिवाय गणेशोत्सवाचा कालावधी दहा दिवसांचा असतो. केवळ दहाच दिवसांसाठी कशाला अधिकृत वीज जोडणी घ्यायची, असा विचार करून अनेक गणेश मंडळे अनधिकृत वीज जोडणी घेत असल्याचेच दिसते. काहींनी मंडळातील सदस्य, परिसरातील व्यापारी, दुकाने, चक्की तसेच मिळेल तेथून तात्पूरती वीज जोडणी घेतल्याचे दिसते. महावितरणच्या वर्धा उपविभागात सर्वाधिक ११ तात्पूरत्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश जोडण्या वर्धा शहरातील असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंगणघाट उपविभागातील केवळ एकाच सार्वजनिक गणेश मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेतली तर आर्वी विभागातील चार गणेश मंडळांना तात्पूरती जोडणी देण्यात आली आहे.
अनधिकृत वीज जोडण्या घेतल्या जाऊ नये, कुणाच्या घर, दुकानातून वीज घेऊ नये वा विजेची चोरी होऊ नये म्हणून महावितरणने घरगुती वीज दरांपेक्षाही कमी दरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पूरती वीज जोडणी देऊ केली होती. या योजनेबाबत जिल्ह्यात बऱ्यापैकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला; पण गणेश मंडळांनी या योजनेला प्रतिसादच दिला नसल्याचे दिसून येत आहे. २०४ नोंदणी झालेल्या मंडळांपैकी केवळ १६ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली. यामुळे अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर महावितरणकडून काय कार्यवाही केली जाते, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कमी दरातील वीज पुरवठ्यालाही नकारच
महावितरणने धार्मिक उत्सवासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तात्पुरते मीटर बसविण्याचा खटाटोप करायलाही महावितरण तयार होते. जनजागृतीही केली. सार्वजनिक गणेश मंडळांना सूचनाही दिल्या; पण गणेश मंडळांना स्वस्तातील अधिकृत वीज जोडणी नकोच, असेच दिसते. शनिवारपर्यंत १६ मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतल्याने इतरांचे काय, हा प्रश्नच आहे.
सर्वच मंडळांमध्ये रोषणाई
जिल्ह्यात २०४ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झालेली आहे. यातील बहुतांश मंडळांनी आकर्षक रोषणाई केली तर काहींनी विजेची बचत करीत कमी विद्युत व्यवस्था ठेवली. असे असले तरी त्यांना विजेची गरज पडत आहे. मग, त्यांनी अधिकृत वीज जोडणी का घेतली नाही, हा प्रश्नच आहे.
कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष
अनधिकृत वीज जोडणी घेताना धोका होण्याची शक्यताच अधिक असते. कुठे वायरचा तर कुठे मीटर वा खांबावर धोका होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले होते; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता महावितरण अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकारी अभियंता सदावर्ते यांना विचारणा केली असता अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर कार्यवाही केली जात आहे, असे सांगितले.