अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘वॉच’
By admin | Published: June 10, 2015 02:16 AM2015-06-10T02:16:51+5:302015-06-10T02:16:51+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. यासोबतच मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ये-जा करण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत.
कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात : कामचुकारपणावर अंकुश बसणार
राजेश भोजेकर वर्धा
जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. यासोबतच मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ये-जा करण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून विना कामाने होणारी वर्दळ थांबणार असून प्रशासनातील कामचुकारपणावरही आपसुकच अंकुश बसणार आहे.
लालफितशाहीचा फटका नेहमीच सामान्य नागरिकांना बसतो. शासकीय कार्यालयात चकरा मारुन सर्वसामान्य अखेर थकून जातो; मात्र काम होत नाही, हा नेहमीचाच अनुभव. जर अधिकाऱ्याचा प्रशासनावर वचक असेल, तर कामांनाही गती मिळते, असा प्रत्यय सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नवे जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांचा प्रशासकीय बाणा दाखविणे सुरू केले आहे. यामुळे प्रशासनातील कामांना गती आल्याचा अनुभव आता नागरिकांनासह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनासुद्धा येत आहे. तसे आपसात बोलत आहे.
आशुतोष सलील यांनी रूजू झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुरु असलेल्या बैठकांच्या माध्यमातून त्यांच्या कामाची पद्धतच लक्षात येत आहे. कोणती कामे करायचीय. किती वेळातच करायचीय, याचे नियोजन करा. काम होत नसेल, तर मला सांगा, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. यासोबत फाईली धूळखात राहू नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. यानंतर यंत्रणा खळबडून जागी झाली. फाईलीचा प्रवासही सुपरफास्ट झाला. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींवरही जिल्हाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केद्रीत केल्याचे दिसते. कार्यालयाच्या प्रवेश द्वारापासून तर आतील भागात ठिकठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे मंगळवारपासून सक्रिय झाल्याची माहिती सूत्राने दिली. विविधा इमारतीतील सेतू केंद्रही कॅमेऱ्याच्या निगराणीत आले आहे. सेतू केंद्रातील दलालांचा वाढता सुळसुळाटही बंद होण्याच्या आशा बळावल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मागील बाजूचा दरवाजाही आता कायमचा बंद करण्यात आला आहे. कुणालाही जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करावा लागणार आहे. यामुळे आपसुकच नागरिकांसह अधिकारी आणि कर्मचारीही या कॅमेऱ्यांच्या दृष्टीस पडणार आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांचा थेट वॉच असेल. यामुळे यंत्रणेतील कामचुकारपणा उघड होणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावरही आता पोलीस कर्मचारी तैनात आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला शिस्त लागतील, असे बोलले जात आहे.