अखेर आमदारांच्या उपोषण मंडपात पोहोचले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 05:00 AM2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:21+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही.

Officials finally reached the MLA's fasting tent | अखेर आमदारांच्या उपोषण मंडपात पोहोचले अधिकारी

अखेर आमदारांच्या उपोषण मंडपात पोहोचले अधिकारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि सरपंच गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु, एकाही अधिकाऱ्याने या उपोषणाची दखल घेतली नसल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी अधिकाऱ्यांचे पाय उपोषण मंडपाकडे वळले.
 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, याकरिता आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर व दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. खुद्द आमदार उपोषणाला बसल्यावरही अधिकारी खुर्च्या राखत असल्याने रोष व्यक्त होत होता. शुक्रवारी ‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधीक्षक लोखंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सावंत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी उपोषण मंडपात जाऊन मागण्या जाणून घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. उलट हे उपोषण आणखी व्यापक होणार,  असा इशारा आ.कुणावार यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष तथा गटनेता नितीन मडावी, सभापती माधव चंदनखेडे, कामगार नेता मिलिंद देशपांडे यांच्यासह उपोषणकर्ते उपस्थित होते.

तुम्ही अधिकारी, राजकारण करु नका! 
-  अखेर ‘लोकमत’च्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आ. कुणावार यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु, गेल्या तीन दिवसापासून एकाही अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची बाजू जाणून घेतली नाही. त्यामुळे आमदारांनी या अधिकाऱ्यांना ‘साहेब... तुम्ही अधिकारी आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी येथे उपोषण सुरु आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन समस्या सोडविणे अपेक्षित आहे. कोण्या नेत्याच्या दबावात येऊन राजकारण करु नका!’, असा सज्जड इशारा दिला.

 सर्व आमदार मिळून आवाज उठवणार : चंद्रशेखर बावनकुळे
-    माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या उपोषणस्थळी उपस्थित राहून आमदार कुणावार यांच्याशी चर्चा केली. तसेच मागील सरकारच्या काळात तिन्ही कंपन्या नफ्यात होत्या. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांमुळे कंपन्या तोट्यात येत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी कापणे बंद करा, पथदिवे सुुरू करा,  सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोगलशाही करु नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सर्व आमदार मिळून ३ तारखेला पायऱ्यावर बसून आंदोलन करु. गरज पडल्यास आझाद मैदानावर मोर्चा काढू असा इशारा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना दिला.

 

Web Title: Officials finally reached the MLA's fasting tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.