अधिकारी दिसताच चोरटे पसार
By admin | Published: January 24, 2017 02:19 AM2017-01-24T02:19:11+5:302017-01-24T02:19:11+5:30
सुरगाव नजीकच्या नागटेकडी भागातील सर्व्हे क्र. १५, १६ व १७ मधील बाभुळबन चोरट्यांनी साफ केले. गत दोन
नागटेकडीचे बाभूळबन साफ : दोन महिन्यांपासून सुरू होती वृक्षांची कत्तल
अरविंद काकडे ल्ल वर्धा
सुरगाव नजीकच्या नागटेकडी भागातील सर्व्हे क्र. १५, १६ व १७ मधील बाभुळबन चोरट्यांनी साफ केले. गत दोन महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू होता. जागरुक नागरिकांनी वनरक्षक महिलेच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. तेव्हा प्रकरण उघड झाले. सदर महिलेने रविवारी सायंकाळी ग्रामस्थांसह बाभूळबन गाठले असता चोरट्यांनी साहित्य टाकून पळ काढला; पण आता नव्याने हद्दीचा वाद निर्माण झाल्याने चौकशीत बाधा आली आहे.
जुवाडी बिटात येणाऱ्या सदर नागटेकडी शिवारात मोठे बाभुळबन आहे. अवाढव्य अशी बाभळीची झाडे या ठिकाणी उभी होती. यामुळे चोरट्यांची त्यावर नजर पडणे स्वाभाविक होते. अत्यंत कमी वर्दळ असलेला हा भाग आहे. यामुळे गत दोन महिन्यांपासून आरा व कटरने वृक्षांची सर्रास कत्तल केली जात होती. शिवाय यातील लाकडे ट्रकद्वारे घेऊन जाण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला होता. दोन महिन्यांपासून वृक्ष संपत्तीची सर्रास लूट होत असताना वन विभागाला मागमूसही नव्हता. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
वृक्ष कत्तलीच्या या प्रकाराची काही युवकांना कुणकुण लागली. त्यांनी लगेच झडशी सहवनक्षेत्राच्या बिटरक्षक सी.पी नागरगोजे यांना माहिती दिली. त्या धाडसी महिलेने काही ग्रामस्थांना सोबत घेऊन रविवारी धाड टाकली. अधिकारी व ग्रामस्थ येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी वृक्ष कत्तलीचे साहित्य घटनास्थळीच ठेवून पलायन केले. नागरगोजे यांनी ग्रामस्थांच्या समोरच झाडाच्या बुंध्याचे व घटनास्थळावरील लाकडाचे मोजमाप घेतले; पण अंधार पडू लागल्याने चौकशी थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. सोमवार उजाडताच या अवैध वृक्षतोडीने वेगळे वळण घेतले. सदर क्षेत्र हे झडशी नव्हे तर सेलू सहवनक्षेत्रात येत असल्याचे सेलूच्या सहवनक्षेत्र अधिकारी एस.टी. लखटे यांना कळविण्यात आले. यावरून त्यांनीही लगेच घटनास्थळ गाठले; पण येथेही महसूल की वनक्षेत्र, हा संभ्रम कायम असल्याचे दिसून आले. येथे सर्व्हे क्र. १५ व १६ वनविभागाच्या अख्त्यारीत येते तर सर्व्हे क्र. १७ महसूल विभागाच्या हद्दीत आहे. यातही कुठून कोणता सर्व्हे क्रमांक सुरू होतो व हद्द कुठे संपते, याबाबत क्षेत्र सहायक संभ्रमात आहेत. परिणामी, यातच वेळ खर्ची घातला जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, चोरट्यांनी मात्र अवाढव्य अशी सुमारे १०० च्या वर झाडे लंपास केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यातील आरोपी कोण आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे अद्याप अनिश्चित आहे. सोमवारीही चौकशी अर्धवटच राहिल्याने मंगळवारी अधिकारी काय निर्णय घेतात, यावर कार्यवाही अवलंबून राहणार आहे. वन व महसूल विभागाने हद्दीचा वाद बाजूला ठेवून वृक्षांची अवैध कत्तल करणाऱ्यांवर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
४वर्धा जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्रामध्ये शिकारी आणि वृक्षतोडीच्या घटनांना उधान आले आहेत. काही ठिकाणी या घटना उघड होतात तर बहुतांश घटना दडपल्या जात असल्याचेच दिसून येते. परिणामी, वन विभागासह कोट्यवधी रुपयांच्या वनसंपत्तीचे दोहन होत असल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने वन आणि वन्य जीवांच्या संरक्षणासाठी मोठा ताफा उभा केला आहे. असे असले तरी जंगलांमध्ये घडणाऱ्या घटनांवर वन विभागाला आळा घालणे शक्य झालेले नाही. या दृष्टीने उपाययोजना करणेच गरजेचे झाले आहे.
सदर नागटेकडीचा भाग व जेथून बाभळी चोरी गेल्या आहेत, ते क्षेत्र सेलू सहवनक्षेत्रात येते. यामुळे त्याबाबतची माहिती सेलूच्या क्षेत्र सहायकला दिली आहे.
- जी.एस. कावळे, क्षेत्र सहायक, झडशी.
सोमवारी मी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सर्व्हे क्र. १५, १६ वनविभाग तर सर्व्हे क्र. १७ महसूल विभागाचा आहे. सिमांकन निश्चित झाल्यानंतर कुणाच्या हद्दीतील झाडांची चोरी झाली, हे सांगता येईल.
- एस.टी. लखटे, क्षेत्र सहायक, सेलू
बाभळीची झाडे तोडल्याप्रकरणी जागा कुणाची, हा काही विषय नाही. सदर प्रकरणातील मुख्य आरोपीचा सुगावा लागला असून शोधपथक तयार केले आहे. उद्या पंचनामा करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येईल.
- पी.एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.
उद्या मी मोक्का पाहणीसाठी मंडळ अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करतो. वन वा महसूल कोणत्याही क्षेत्रात अवैध वृक्षतोड करणाऱ्याला शोधून गुन्हा दाखल करून गजाआड करण्यात येईल.
- डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, सेलू.