गोडधोड दूरच, दोन वेळच्या जेवणाचीही चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:49 PM2021-10-28T17:49:58+5:302021-10-28T17:55:10+5:30
कोरोनात निराधारांच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता दोन दिवसांत दिवाळी असल्याने काय करावे? असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
वर्धा : शासनाच्या अनुदानाचा मोठा आधार निराधारांना आहे. मात्र, हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. कोरोनात निराधारांच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता दोन दिवसांत दिवाळी असल्याने काय करावे? असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
निराधारांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी, निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आदींचा समावेश आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साह्य देण्यात येते. ६५ वर्षांहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरुष, दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या निराधार व आर्थिकदृष्ट्या असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या योजनेचा लाभ मिळतो.
त्यांच्या मानधनाची रक्कम बँक खात्यात जमा होते. त्यामुळे निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत जावून अनुदान बँक खात्यात जमा झाले का? अशी विचारणा करीत आहेत. अनुदान अजूनपर्यंत बँक खात्यात जमा झाले नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे तहसील कार्यालयातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार कक्षात येऊन अनुदानाविषयी विचारणा करण्यात येते. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत अनुदान आले नाही, असे उत्तर मिळत आहे. तीन महिन्यांचे अनुदान तत्काळ देऊन दिलासा देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. जुलै महिन्याचे अनुदान या आठवड्यात मिळाले त्यामुळे निराधारांची दिवाळी दूरच, साधे खाण्याचीही आता चिंता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी
संजय गांधी निराधार योजना २४,४६२
श्रावणबाळ योजना ५७,६२१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना ३१,०१४
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना ९७७
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना २५१
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ७४
तीन-तीन महिने विनाअनुदान कसे जगणार!
आता दिवाळी आहे ते सोडाच, पण दरोरोज जेवणाचीही चिंता आहे. तीन महिने झाले पैसे जमा झाले नाही, असे पोस्टात सांगितले. दररोज चकरा मारून आम्ही त्रस्त झालो आहे. केव्हा पैसे जमा होणार काय माहीत.
द्वारकाबाई बोबडे, लाभार्थी.
तीन महिन्यांपासून पैसे दिले नसल्याने परिस्थिती मोठी खराब झाली आहे. घरात कमविणारे दुसरं कुणीच नाही, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कसे करावे, असा प्रश्न आता पडला आहे.
गौरा राजेश वानखडे, लाभार्थी.
या योजनेत 9 प्रकारचा शासन लाभार्थ्यांना लाभ देता येते. लाभार्थ्यांना शासनाकडून आलेले पैसे वितरित करण्यात आले आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार आणि इंदिरा गांधी वेतन योजनेचे शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वितरित केले जाणार आहे.
विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आर्वी.