जुनी दुश्मनी : रात्री घरावर दगडफेक, वृद्धावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 02:16 PM2023-11-08T14:16:40+5:302023-11-08T14:17:08+5:30
गणेशनगर परिसरातील घटनेने खळबळ : शहर पोलिसांनी ठोकल्या सात आरोपींना बेड्या
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रामनगर परिसरातील गुन्हेगारांच्या टोळीने बोरगाव मेघे येथील गणेशनगरात धुमाकूळ घालून वृद्धाच्या घरावर दगफेक करून दुचाकींची तोडफोड करीत जीवघेणा हल्ला करीत चांगलाच राडा केला. या घटनेने बोरगाव मेघे परिसर हादरून गेला आहे. ही घटना ६ रोजी रात्री २:०० वाजताच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी घटना घडताच अवघ्या काही तासांमध्ये सात आरोपींना बेड्या ठोकल्या असून, जवळपास १८वर आरोपींवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.
पुरुषोत्तम नत्थू पुसदेकर (६१, रा. गणेशनगर) असे जखमी असलेल्या वृद्धाचे नाव आहे, तर पोलिसांनी अटक केलेल्यांत प्रज्वल दिनेश गुजर (रा. रामनगर), अनिकेत सतीश वानखेडे (रा. सिंदी मेघे), सोहेल खान रहेमान खान (रा. सिंदी मेघे), गौरव रवींद्र गोहाडे (रा. सिंदी मेघे), अभिषेक राजेश घुंगरुड (रा. रामनगर), राजेश शंकर लांबाडे (रा. सिंदी मेघे), सम्यक प्रताप डहाके (रा. सिंदी मेघे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फरार असलेल्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर याचा आणि आरोपींमध्ये जुना वाद आहे. आकाशचे वडील पुरुषोत्तम पुसदेकर रात्रीच्या सुमारास घरी झोपून होते. दरम्यान, मध्यरात्री २:०० वाजताच्या सुमारास जवळपास १८ ते २० आरोपींनी घरावर दगडफेक केली. खिडक्यांच्या काचा फुटल्याने पुरुषोत्तम घराबाहेर निघाले असता आरोपींनी तुझा मुलगा कुठे आहे, त्याचा आज गेम करतो, असे म्हणत घरात प्रवेश करून पुरुषोत्तम यांच्यावर जीवघेणा हल्ला करून घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर मुलगा आकाशच्या मित्राची घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकीही तोडफोड केली. शिविगाळ करून सर्व आरोपी निघून गेले. दरम्यान, पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी तत्काळ बोरगाव मेघे गाठून पंचनामा करून गुन्हा दाखल केला.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी तत्काळ पोलिस पथकांना रवाना करून आरोपीस अटक करण्याच्या सूचना केल्या. पोलिसांनी अवघ्या काही तासात घटनेतील सात आरोपींना अटक केली, तर उर्वरित आरोपींच्या शोधार्ध पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती दिली.
रामनगरात शिजला मारण्याचा कट
रामनगर परिसर सध्या गुन्हेगारांच्या टोळ्यांनी भरला आहे. रामनगर परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याचे नागरिक सांगतात. मात्र, पोलिसांकडून कारवाई होताना दिसून येत नाही. बोरगाव येथील गणेशनगरात झालेल्या हल्ल्याचा कट रामनगर परिसरातच रचण्यात आला. त्यानंतर तेथूनच त्यांनी दुचाकींवर बसून मध्यरात्री बोरगाव गाठले. रामनगर परिसरातून ते दुचाकीवर बसून निघाले तर पोलिसांची गस्त कुठे होती, असा प्रश्न उपस्थित होतो.
तडीपार गुंड शहरात वावरतात तरी कसे ?
रामनगर पोलिसांनी मागील महिन्यातच तडीपार गाव गुंडांची यादी जाहीर केली होती. या यादीत तुषार बादलमवार याचाही समावेश होता. मात्र, तो अगदी बिनधास्तपणे रामनगर हद्दीत वावरत होता. त्याच्यासोबत यश परातेदेखील बिनधास्तपणे वावरत होता. पोलिसांनी त्याला जिल्ह्याबाहेर सोडून दिले होते. मग तडीपार गावगुंड बिनधास्त शहरात वावरतात तरी कसे, असा प्रश्न सहज उपस्थित होतो.