जुने पं.स. सभागृह अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:57 PM2017-08-26T22:57:48+5:302017-08-26T22:58:20+5:30
नवीन इमारती मिळाल्या की, जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष होते. मग, त्या अडगळीत पडून अनेक समस्या निर्माण होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवीन इमारती मिळाल्या की, जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष होते. मग, त्या अडगळीत पडून अनेक समस्या निर्माण होतात. सध्या वर्धा पंचायत समिती सभागृहाचे तेच होत आहे. नवीन इमारत झाल्याने जुने पं.स. सभागृह अडगळीत पडले आहे. सध्या या इमारतीची दुरवस्था होत आहे. गटविकास अधिकाºयांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
काही वर्षांपूर्वी वर्धा पं.स. ला नवीन इमारत मिळाली. याच इमारतीत सर्व विभाग तथा सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जुने पं.स सभागृह अडगळीत पडले आहे. त्या इमारतीकडे सहसा कुणाचे लक्ष जात नसल्याने तेथे अस्वच्छता पसरली असून झुडपे वाढली आहेत. परिणामी, सरपटणाºया प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. जुन्या सभागृहाच्या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय त्या परिसरात जाणारे रस्तेही बंद करण्यात आले नाही. यामुळे कुणीही जुन्या पं.स. सभागृह परिसरात सहज जाऊ शकतो. यामुळे अनैतिक प्रकारांनाही या परिसरात उधान आल्याचे दिसून येत आहे. घाणीच्या साम्राज्याने कर्मचारी तथा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी पंचायत समिती प्रशासन मात्र याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक कार्यालये भाडेतत्वावर
शासनाच्या अनेक विभागांचा कारभार प्रशासकीय भवन व शासकीय इमारती असताना भाडेतत्वावरील इमारतीत आहे. वर्धा पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्याने जुनी इमारत अन्य एखाद्या शासकीय कार्यालयाला भाडेतत्वावर देता आली असती; पण तसे कुठलेही प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. शासकीय कार्यालयांसाठी खासगी इमारत धारकांना पैसा दिला जात आहे. शासकीय इमारतींची मात्र दुर्लक्षामुळे दुरवस्था होत असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका
वर्धा पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्यामुळे जुन्या सभागृहाच्या इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. यातील स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याची परिसरात दुर्गंधी येत असल्याने कर्मचाºयांना तेथे काम करणे कठीण होते. शिवाय दुर्गंधीमुळे कर्मचारी तथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटविकास अधिकाºयांनी याकडे लक्ष देत इमारतीचा वापर करणे वा स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे.