भरधाव मालवाहू कोसळला नदीत; वृद्ध महिलेचा बुडून अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 12:14 PM2022-03-07T12:14:46+5:302022-03-07T12:25:30+5:30
हा अपघात शनिवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बाभूळगाव (कोंगा) शिवारात झाला.
सेलू (वर्धा) : तेरा व्यक्तींना घेऊन परतीचा प्रवास करीत असलेल्या मालवाहूचा टायर अचानक फुटला. दरम्यान वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन थेट नदीत कोसळे. यात वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बाभूळगाव (कोंगा) शिवारात झाला.
देवळी तालुक्यातील पळसगाव (आबाजी), तसेच सेलू तालुक्यातील सुरगाव येथील काही भाविक एमएच ३२ एजे २६२२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने नागपूर जिल्ह्यातील वाकी, ता. सावनेर येथे शनिवारी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळ्यानंतर हे सर्व व्यक्ती वाकी येथील दर्गाह येथे दर्शनासाठी थांबले. दर्शनानंतर यात्रा उत्सवाचा आनंद लुटल्यावर या प्रवाशांनी मालवाहू वाहनानेच परतीचा प्रवास सुरू केला.
काही प्रवासी सुरगाव येथे उतरले. त्यानंतर उरलेल्या तेरा प्रवाशांना घेऊन हे वाहन पुढील प्रवास करीत असताना भरधाव वाहन बाभूळगाव (कोंगा) येथील वाघाडी नदीच्या पुलावर आले. दरम्यान, वाहनाचा समोरील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. अशातच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीपात्रात कोसळले. नदीत वाहन कोसळल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदत कार्यात हातभार लावला.
बारा प्रवाशांना सुखरूप नदीबाहेर काढण्यात यश आले असले, तरी लक्ष्मी तानबा लोखंडे (७४) यांचा बुडून मृत्यू झाला. तर, उर्वरित बारा प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाची पत्नी नीलिमा हेमंत पाटील (२८) व चार वर्षीय मुलगी देवांशी यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.