‘लास्ट होम’करिता ओम पुरी बापू कुटीत
By admin | Published: September 29, 2014 12:49 AM2014-09-29T00:49:07+5:302014-09-29T00:49:07+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवन व येथील वास्तव्यावर ‘लास्ट होम’ हा माहिती पट निर्माण करण्यात येत आहे. या माहिती पटाच्या चित्रीकरणाला शनिवारी आश्रमात सुरुवात झाली.
सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवन व येथील वास्तव्यावर ‘लास्ट होम’ हा माहिती पट निर्माण करण्यात येत आहे. या माहिती पटाच्या चित्रीकरणाला शनिवारी आश्रमात सुरुवात झाली. या माहितीपटाकरिता सिने अभिनेता ओम पुरी आश्रमात दाखल झाले. याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच ओम पुरी यांना पाहण्याकरिता गर्दी झाली होती.
वर्धेच्या महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यापीठांतर्गत कला व नाट्य विभागाद्वारे हा माहिती पट तयार करण्यात येत आहे. विभागप्रमुख प्रा. सुरेश शर्मा यांच्या या माहितीपटाचे निर्देशक म्हणून तथागत प्रकाश व नवागत प्रकाश काम पहात आहे. बापुंचे प्रथम निवासस्थान, आदी निवास, बापू कुटी, आखरी निवास, रसोडा व प्रार्थना भूमी इत्यादीची माहिती या चित्रपटातून देण्यात येत आहे. बापुंचे १९३६ ते ४६ असे दहा वर्ष कायम वास्तव्य येथे होते. १९४८ पर्यंत सत्याग्रह व आंदोलनामुळे फार कमी काळ ते सेवाग्राम आश्रमात आले. हिंदी विद्यापीठात २९, ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबरला चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात अभिनेता ओम पुरी यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रदीपदास हिराभाई, अशोक गिरी, नामदेव ढोले, सागर कोल्हे, प्रभाकर आत्राम, रामसिंग बघेल, शोभा जाधव, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल, माया ताकसांडे आणि नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)