यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:34 PM2021-12-22T15:34:11+5:302021-12-22T17:32:40+5:30
एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्धा : कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने यंदा तब्बल दोन वर्षांनंतर थर्टी फर्स्टचा माहोल पाहायला मिळणार आहे. तरुणाईकडून आतापासूनच याचे नियोजन करणे सुरू झाले आहे. मात्र, ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे नागरिकांनी थर्टीफर्स्ट घरातच साजरे केले. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने तरुणाईने आतापासूनच थर्टीफर्स्टचे नियोजन करणे सुरु केले आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक केले जाणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसते.
तर दिवसभरात १२,००,००० रुपयांची उलाढाल
शहरासह लगतच्या परिसरात सुमारे ३५० वर हॉटेल्स, रेस्टाॅरंट आहेत. दिवसभरात या हॉटेल्समध्ये अनेक नागरिक जेवण करण्यासाठी जातात. दिवसभरात सुमारे १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र, ओमायक्राॅनमुळे कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा होईल की उत्साहावर पाणी फेरले जाईल, या विवंचनेत हॉटेल चालक व मालक असल्याचे दिसून येत आहे.
पुढील आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता
प्रशासनाने शिथिल केलेले निर्बंध काही प्रमाणात कडक केले आहेत. जिल्ह्यात ओमायक्राॅनचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी पुढील धोका लक्षात घेता यंदा थर्टीफर्स्टच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात प्रशासनाकडून नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती आहे.
हॉटेल चालक म्हणतात...
दोन वर्षांपासून कोरोनामुळे थर्टीफर्स्ट साजरा करण्यावर निर्बंध होते. हॉटेलमध्ये अत्यंत तुरळक गर्दी होती. यंदाचा थर्टीफर्स्ट उत्साहात साजरा न झाल्यास हॉटेल मालकांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- आकाश राजूरकर, हॉटेल चालक
कोरोना संकटामुळे हातचे काम गेले. मी नव्यानेच हॉटेल टाकले. आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. थर्टीफर्स्टसाठी नियोजनही केलेले आहे. आता प्रशासनाने पुन्हा निर्बंध लादल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाने हॉटेल चालकांचा विचार करावा.
- आशुतोष धोटे, हॉटेल चालक.
आरोग्य महत्त्वाचे, स्वागत नंतरही करता येईल
कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घरात राहूनच थर्टीफर्स्टचे स्वागत करावे. आधी आरोग्य महत्त्वाचे आहे. स्वागत पुढील वर्षातही करता येईल.
- प्रणय राऊत.
मागील दोन वर्षांपासून आम्ही कुठलेही सण, उत्सव साजरे केलेले नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करण्यास मुभा द्यावी, अन्यथा केलेल्या नियोजनावर पाणी फिरेल.
- विजय पारखी.