अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने उफाळला ‘जनआक्राेश’; आरोपीस ठोकल्या बेड्या
By चैतन्य जोशी | Published: September 3, 2022 05:57 PM2022-09-03T17:57:08+5:302022-09-03T18:09:40+5:30
१६ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.
वर्धा : जिल्ह्यातील तळेगाव (टालाटुले) गावात अवघ्या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या घटनेने उलटसुलट चर्चेला उधाण आल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता रुग्णालयात मृतक मुलीच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावातील नागरिकांचा जनआक्राेश उफाळला होता. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मृतक मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन मारेकऱ्याविरुद्ध ३ रोजी हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यास बेड्या ठोकल्या.
तळेगाव टा. गावातील विहिरीत २ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने गावात चांगलीच खळबळ माजली होती. अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. मात्र, मुलीचा मृतदेह आढळुन आल्याने मृतक मुलीच्या नातलगांनी तसेच गावकऱ्यांनी पोलीस विभागाला चांगलेच धारेवर धरले. इतकेच नव्हे तर गावांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
मुलीचा मृतदेह पोलिसांनी २ रोजी रात्रीच्या सुमारास वर्ध्यातील सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. मात्र, रात्रीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतक मुलीच्या नातलगांनी गर्दी केली होती. जिल्हा रुग्णालयातही तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली होती. आरोपीवर कारवाई करीत अटक करण्याची मागणी नातलगांसह गावकऱ्यांनी रेटून धरली होती. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी गोपाल किसना फाटे (२३) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.