'स्टोरी टेल'च्या धर्तीवर आता राज्यात 'महाराष्ट्र टेल', सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
By महेश सायखेडे | Published: October 2, 2022 04:21 PM2022-10-02T16:21:00+5:302022-10-02T16:21:46+5:30
Sudhir Mungantiwar: महाराष्ट्रातील ८५० शूरविरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्टोरी टेलच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र टेल विकसित केले जाईल
- महेश सायखेडे
वर्धा - एकविसव्या शतकात वाचन कमी होत आहे. इतकेच नव्हे तर विविध विषयांची माहिती स्ट्रोरी टेलच्या माध्यमातून आत्मसात केली जात आहे. महाराष्ट्रातील ८५० शूरविरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्टोरी टेलच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र टेल विकसित केले जाईल, अशी घोषणा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा येथे केली.जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित हॅलो ऐवजी वंदे मातरम् व ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ तसेच वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचा समारोप प्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पशुसंवर्धन तसेच दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आंतरराष्ट्रीय जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नुकत्याच ३० सप्टेंबरला जागतिक नदी दिवस साजरा करण्यात आला. नदीला आपण आई म्हणतो. देवाने मनुष्य यौनी तयार केली. पण मनुष्यांनी नदींचे शोषण केल्याचे वास्तव आहे. तर आता स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाचे औचित्य साधून जलबिरादरी तसेच जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांचे सहकार्य घेत एक मोठी लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील ७५ नद्या अमृत वाहिन्या बनविण्याचा विडा उचलला आहे. नागरिकांनीही या महत्त्वाकांशी उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.
राष्ट्रपित्यांना अभिप्रेत असे काम सेवा पंधरवाड्यात वर्ध्यात झाले : फडणवीस
वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. या सेवा पंधरवाड्यांच्या निमित्ताने राष्ट्रपित्यांना अभिप्रेत असेच काम वर्ध्यात झाले आहे. दारिद्रनारायणाची सेवा ही राष्ट्रसेवा आहे. महाराष्ट्रात नाही असे जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे तयार झाले असून त्याचे उद्घाटनही आज झाले आहे. कार्यालयाची भव्यता इमारतीवरून नाही तर तेथून मिळणाऱ्या सेवेने ठरते. शिवाय वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येकाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न होईल. वर्ध्यात काढण्यात आलेल्या गॅझेट प्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यातील सर्वांगीण माहिती असलेले गॅझेट तयार करण्यात येईल, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जल हे खरे अमृत : डॉ. राजेंद्र सिंह
देशात महाराष्ट्र एकटे असे राज्य आहे ज्याने जलयुक्त आणि जल साक्षरता विषयावर मोठे काम केले आहे. जल हे खरे अमृत असून महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृत वाहिन्या बनविण्यासाठीचा नदी परिक्रमा हा उपक्रम उत्कृष्टच आहे. महाराष्ट्र शासनाने नद्यांचे संवर्धन व्हावे या हेतूने शनिवारी काढलेला शासन निर्णय कौतुकास्पद आहे, असे आंतरराष्ट्रीय जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.