शेतमालाला दीडपट भाव, नुसताच ठरतोय जुमला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:12 PM2024-10-30T17:12:25+5:302024-10-30T17:14:07+5:30
कापूसविक्रीतून हाती घाटाच : एकरी ५ हजारांचा बसतोय फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : दिवाळीच्या तोंडावर बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात खासगी व्यापारी कापसाला सात ते साडेसात हजार भाव देत आहे. एक एकरातील कापूस लागवडीसाठी येणारा खर्च व त्यातून सरासरी येणारे उत्पादन व बाजारभाव याची जुळवणी केल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपयांचा थेट फटका बसतो आहे. शासनाच्या वतीने शेतमालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन नुसतेच जुमला ठरते आहे. तर शेतकऱ्याने केलेली मेहनतही हाती पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यासाठी सरासरी शेतकऱ्यांना सरासरी ३३ हजार ७०० रुपये खर्च आला. यात उन्हाळा वाही मशागत २००० रु., सारे अथवा बेड फाडणे १००० रु., बियाणे दोन बॅग १ हजार ६०० रुपये, लावण खर्च ५०० रु., डवरनी ४ फेर २००० रू., खताची मात्र दोन वेळा दोन हजार रू., खत टाकने मजुरी ६०० रू., दोनवेळ नींदन खर्च १० हजार रू, फवारणी औषधी खर्च पाच हजार, फवारणी मजुरी दोन हजार, वण्य प्राण्यापासून संरक्षणासाठी कंपाउंड करणे एक हजार, वेचणी खर्च पाच हजार, कापूस विक्रीसाठी बाजारात शेतमाल वाहून नेण्यासाठी भाडे एक हजार असा खर्च आला आहे. यात मजूर उपलब्ध असण्यावर मजुरी अधिक तर डवरण, फवारणीसाठी वेळेवर मजूर बैलजोडी न मिळाल्यास अधिकचे भाडे द्यावे लागले. तो खर्चही यातून वगळण्यात आला आहे.
कापूस पिकाचा सरासरी विचार केल्यास एकरी चार क्विंटलपेक्षा अधिक होण्याची शक्यता नाही. अशात दिवाळी सण गोड व्हावा म्हणून शेतकऱ्यांकडून शीतादही केलेल्या कापसाची वेचणी करीत शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेला जातो आहे. मात्र भाव दबावात असल्याने नाइलाजास्तव शेतकऱ्यांना सात साडेसात हजारांना कापूस व्यापाऱ्यांच्या घशात टाकावा लागतो आहे. कापूसविक्रीतून शेतकऱ्याला २८ ते ३० हजार रुपये हाती पडणार आहे. शेतीवर होणारा खर्च, बघता उत्पादनातून हाती पडणारी रोख यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. हीच गत सोयाबीन पिकाची आहे. तर तूर पीक यंदाच्या अतिवृष्टीत सखल भागातील पीक मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाले.
कपाशीवर आला लाल्या
किमान कपाशीच्या दोन वेच्यानंतर कपाशीवर लाल्या रोग आढळून येत होता. यंदा मात्र पहिली वेचणीच्या वेळीच लाल्या रोगाचे आक्रमण दिसून आले आहे. पाने लाल पडली असून बोंडे धरायच्या आधीच झाडे वाळतील की काय अशी स्थिती दिसून येत आहे.