‘वॉश-आऊट’च्या धाडीत दीड कोटीचा गावठी दारूसाठा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:11+5:30
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करून दारुविक्रेत्यांवर कारवाई सत्र राबविण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या हद्दीतील गावठी दारुभट्ट्यांवर धाडी टाकून सुमारे दीड कोटीवर गावठी दारुसाठा नष्ट करून दारू गाळणारे साहित्य जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी पोलीस दलाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ‘वॉश आऊट’ मोहीम राबविली असून यामध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या तसेच नदीपात्रालगत सुरू असलेल्या गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे १ कोटी ५० लाख ५ हजार रुपयांचा गावठी मोह रसायन सडवा नष्ट केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दारुविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात सण, उत्सव काळात सुव्यवस्था व शांतता राहावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहिमेला गती दिली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करून दारुविक्रेत्यांवर कारवाई सत्र राबविण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या हद्दीतील गावठी दारुभट्ट्यांवर धाडी टाकून सुमारे दीड कोटीवर गावठी दारुसाठा नष्ट करून दारू गाळणारे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक होळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात १९७४ मध्ये दारुबंदी झाली असूनही जिल्ह्यात विदेशीसह अवैध गावठी दारूचा महापूर वाहतो, हे सर्वश्रुत आहे. पोलिसांनी कितीही कारवाया केल्या तरीदेखील दारुविक्रेते पुन्हा शिरजोर होऊन दारुविक्री करीत असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे अशांवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. शहरातही अनेक ठिकाणी खुलेआम दारुविक्री सुरु असून संबंधित पोलीस ठाण्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष आहे.
शहरातील दारुविक्रेत्यांवरही ‘नजर’
शहरात मागील अनेक दिवसांपासून खुलेआम दारुविक्री सुरू आहे. मात्र, आता पोलिसांकडून अशा दारुविक्रेत्यांच्याही मुसक्या आवळण्याच्या सूचना शहरातील चारही पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता शहरातील दारुविक्री करणारे दारुविक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
‘एलसीबी’कडून २२ ठिकाणी छापे
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या तब्बल २२ अवैध गावठी दारुअड्ड्यांवर छापे मारून तब्बल १६ लाख ७९ हजार रुपयांचे दारू गाळणारे साहित्य जप्त करीत गावठी दारूसाठा नष्ट केला आहे.
१६४ ठिकाणी छापे; २३४ विक्रेत्यांवर गुन्हे
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या वॉश आऊट मोहिमेत १६४ ठिकाणी पोलिसांकडून धाडी मारण्यात आल्या असून तब्बल २३४ गावठी दारुविक्रेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे अवैध दारू गाळणाऱ्यांसह विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.