दीड कोटीचा रस्ता वर्षभरात खड्ड्यांत
By admin | Published: September 18, 2015 01:53 AM2015-09-18T01:53:04+5:302015-09-18T01:53:04+5:30
रस्त्यांची दुरूस्ती करताना हलगर्जी केली जात असून संबंधित विभागही दुर्लक्ष करतो. याचे उदाहरण म्हणजे वर्धा ते वायगाव रस्ता होय.
वर्धा : रस्त्यांची दुरूस्ती करताना हलगर्जी केली जात असून संबंधित विभागही दुर्लक्ष करतो. याचे उदाहरण म्हणजे वर्धा ते वायगाव रस्ता होय. गतवर्षीच या रस्त्याच्या दुरूस्तीवर तब्बल १ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले; पण अल्पावधीतच रस्ता जैसे थे झाला. सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दुरूस्तीचा खर्च व्यर्थच ठरल्याचे दिसते.
रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो; पण रस्त्यांची अवस्था सुधारताना दिसत नाही. वर्धा ते वायगाव (नि.) या मार्गाचीही अशीच अवस्था आहे. या मार्गावरील बोरगाव (मेघे) ते नवोदय विद्यालय या ४ किमी रस्त्याचे काम २०१४ मध्ये करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहन धारकांना दिलासा मिळाला होता. या चार किमी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या मार्गाचे तीन भाग पाडण्यात आले होते. यात महावितरण कार्यालय ते बोरगाव (मेघे) साखळी क्र. ५७.५०० व ५८.६०० या १.१ किमी लांब व ७ मिटर रूंदीच्या रस्त्याचे काम फेबु्रवारी २०१४ सुरू झाले. या कामाचे ३० लाख रुपयांचे कंत्राट चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनी पुलगाव यांना देण्यात आले होते. भाग क्र. दोन बोरगाव (मेघे) ते फार्मसी कॉलेजपर्यंत साखळी क्र. ५८.६०० व ६०.५०० या १.९ किमी लांब रस्त्याचे काम मार्च २०१४ मध्ये सुरू झाले. हे काम आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ३६ लाख रुपयांत देण्यात आले. भाग क्र. तीन साखळी क्र. ६०.५०० व ६२.००० अंतर १.५ किमी हे काम एप्रिल २०१४ मध्ये सुरू झाले. या कामाचे ८० लाख रुपयांचे कंत्राट आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले.
चार किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन कंत्राटदार कंपन्यांमार्फत १ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून करण्यात आले; पण हा संपूर्ण निधी व्यर्थ गेल्याचेच दिसते. वर्षभरातच या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यांत पाणी साचते व यामुळे अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दीड कोटी खर्च करूनही डांबरीकरण उखडल्याने रस्त्याचे दुरूस्ती काम अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना संबंधित विभाग त्या कामांकडे लक्ष देत नसल्याचेच दिसते. वर्धा ते वायगाव व पुढे हिंगणघा, राळेगावपर्यंत या मार्गावर सतत रहदारी सुरू असते. शिवाय दोन कंपन्या व अन्य उद्योग असल्याने अवजड वाहनेही धावत असतात. यामुळे या रस्त्याचा दर्जा राखणे गरजेचे होते; पण त्याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. कंत्राटदार व बांधकाम विभाग यांच्यातील कमीशनबाजीमुळे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा शासनाच्या निधीचा दुरूपयोग नव्हे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
बोरगाव ते वायगाव हे १० किमी अंतर आहे. यातील ४ किमीच्या कामावर १ कोटी ४६ लाख रुपये खर्च झाले. यानंतरही रस्ता खड्ड्यांतच आहे. उर्वरित रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर आहे. दिवाळीनंतर सदर काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. या कामात तरी दर्जा राखावा, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)