दीड एकरातील पीक गारद

By admin | Published: July 18, 2016 12:38 AM2016-07-18T00:38:21+5:302016-07-18T00:38:21+5:30

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वत:च्या शेताला हात न लावता शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील धुरा फोडून नालीचे खोदकाम केले.

One-and-a-half peak harvest | दीड एकरातील पीक गारद

दीड एकरातील पीक गारद

Next

 धुऱ्यावर नालीचे खोदकाम : शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी
आष्टी (शहीद) : पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वत:च्या शेताला हात न लावता शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील धुरा फोडून नालीचे खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्याचे दीड एकरातील पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले. नाली खोदणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचा आरोप बेलोरा (बुजरूक) येथील शेतकऱ्याने केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.
बेलोरा येथील शेतकरी अंबादास जाणे यांची मौजा अहमदपूर साजा मध्ये ०.८१ आर (दोन एकर) शेती आहे. यावर्षी मोठ्या कष्टाने त्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. अंबादास यांचे वय ७२ वर्षे असल्याने त्यांच्याकडून अधिक धावपळ होत नाही. यामुळे शेतातील समस्या दिवसागणिक वाढत आहेत. बेलोरा गावातील चिरकुट बोरवार आणि गुलाब घाटोळे या दोन्ही शेतकऱ्यांनी धुऱ्याच्या तोंडावर नाली खोदून माती टाकली. पावसामुळे माती वाहून गेल्याने पाणी साचले. शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेताच्या मधोमध असणारा धुराच पूर्ण खोदण्यात आला आहे.
याबाबत दोन्ही शेतकऱ्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न अंबादास यांनी केला; पण आमचेच बरोबर आहे म्हणत दोघांनीही मुजोरी कायम ठेवल्याचेच दिसते. यामुळे अंबादास यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी निवेदनातून न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतात तलाव साचला असताना अद्याप तहसीलदार, तलाठी यापैकी कुणीही शेताला भेट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास यांच्यावर बँक तथा सावकाराचे कर्ज आहे. उत्पन्न झाले नाही तर कर्जाची परतफेड करणे त्यांना अवघड होणार आहे.
पावसाचे पाणी दरवर्षी वाहून जाण्याचा मार्ग उपलब्ध असताना जाणीवपूर्वक नालीचे खोदकाम करून वेठीस धरण्याचा प्रयत्न दोन्ही शेतकरी करीत आहेत. परिणामी, आत्महत्या करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा मार्ग नाही, असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर कुणीही अधिकारी त्यांची समस्या ऐकून घेत नसल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे आपल्याला न्याय मिळणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरीच शेतकऱ्याचा वैरी झाल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे. पाणी वाहून गेले नाही तर खरीपाचे कुठलेही पीक घेता येणार नाही. वर्षभर कुटुंबाचे पालनपोषण करण्याचे साधन शेतीच असल्याने महसूल विभागाने त्यांना तात्काळ न्याय देणे गरजेचे झाले आहे. दीड एकर पीक उद्ध्वस्त करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा मला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.
अंबादास जाणे यांनी शेतातील खोदकाम केलेल्या नालीबाबत प्रशासनाला सूचना देऊनही अद्याप कोणतीही शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी सरसावले नाही. महसूल विभागाचे अधिकारी यावर प्रतिक्रीया देण्यासही तयार नाहीत. मग, शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्याला न्याय मिळवू देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: One-and-a-half peak harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.