एका क्लिकवर मिळणार राज्यातील पेट्रोलपंपांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:51 PM2019-11-09T19:51:00+5:302019-11-09T19:52:50+5:30
पेट्रोलपंपांवर होणारी ग्राहकांची लूट, भेसळ, अतिरिक्त इंधन साठा, कृत्रिम इंधन टंचाई आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरच प्रत्येक पेट्रोलपंपावर वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पेट्रोलपंपांवर होणारी ग्राहकांची लूट, भेसळ, अतिरिक्त इंधन साठा, कृत्रिम इंधन टंचाई आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरच प्रत्येक पेट्रोलपंपावर वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे पेट्रोलपंपावरील कामकाजात पादर्शकता येणार असून एका क्लिकवर राज्यातील पेट्रोलपंपांची माहिती मिळणार आहे.
ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी भारत पेट्रोलियमने पेट्रोलपंपांवर आधुनिक वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच पेट्रोलपंपांवर आॅटोमशन सेन्सर तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. यामुळे थेट तेल कंपन्यांशी पेट्रोलपंप जोडले जाणार आहेत. पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या इंधनाबाबतच्या वाढत्या तक्रारी, वेळोवेळी पेट्रोलपंपांवरील कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात होणारे वाद, जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारीचे वेळेत न होणारे निर्गतीकरण दखल घेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार भारत पेट्रोलियमच्यावतीने पेट्रोलपंपांवर वायरलेस प्रणाली बसविण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
नवीन पंपांनाही करावा लागेल प्रणालीचा वापर
नवीन पेट्रोल किंवा डिझेल पंपासाठीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. असे असले तरी नवीन पंपांना मान्यता देत असताना या प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.
‘फोर कोट’ म्हणून ओळख
ही अद्ययावत प्रणाली ‘फोर कोट’ म्हणून ओळखली जाणार आहे. यामुळे पेट्रोलपंपाचा असणारा इंधन साठा, ग्राहकांना विकलेले इंधन, किती वाजता विकले, किती मिनिटात दिले याची अचूक नोंद होणार आहे. या प्रणालीचा खर्च सहा लाख रूपये इतका असून तो खर्च कंपनी स्वत: करणार आहे. गैरप्रकार करणाऱ्या पंपधारकांच्या अडचणीत भर पडणार आहे.
विक्रीत येणार पारदर्शकता
पेट्रोलपंपावर इंधन टाकत असताना रीडिंगमधील घोटाळ्यामुळे तेल कमी मिळाल्याच्या तक्रारी होऊन अनेकदा वादही होतात. परंतु, अत्याधुनिक प्रणालीव्दारे याला आता आळा बसणार आहे. या प्रणालीमुळे पेट्रोल, डिझेल विक्रीत पूर्णत: पारदर्शकता येणार आहे. जेवढ्या पैशाचे पेट्रोल ग्राहकांनी भरले असेल तेवढ्याच पेट्रोलची नोंद कंपनीकडे होणार आहे. यामुळे सदर अतिज्वलनशील पदार्थाचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.
२४ तासांत मिळणार माहिती
सदर सेन्सर प्रणालीमुळे टाकीतील इंधन साठा, पेट्रोल, डिझेलची होणारी दररोजची विक्री, खरेदी याची माहिती तेल कंपन्यांना कोड कंट्रोलर सर्व्हरद्वारे चोवीस तासांत मिळणार आहे.