हेटीकुंडी तलावात एक कोटी लिटर जलसंचय
By admin | Published: May 12, 2016 02:24 AM2016-05-12T02:24:19+5:302016-05-12T02:24:19+5:30
ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या हेटीकुंडी येथील गवळाऊ गाय संवर्धन केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिसरातील
गवळाऊ गाईचे केले जाते संवर्धन : जानकीदेवी बजाज संस्थेचा उपक्रम, सहा फूट खोलीकरण
वर्धा : ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या हेटीकुंडी येथील गवळाऊ गाय संवर्धन केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिसरातील तलावाच्या खोलीकरणामुळे सुमारे एक कोटी लिटर पाण्याची संचय क्षमता निर्माण झाली आहे.
हेटीकुंडी येथील गवळाऊ गाय संवर्धन केंद्रात ९२ गाई असून येथील गवळाऊ गाय हे वर्धेचे वैभव म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे या परिसरातील नाला व जुन्या तलावाच्या खोलीकरणासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जानकी देवी बजाज संस्थेला सहकार्य करण्याविषयी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मान्य करून केवळ पंधरा दिवसात नाला व तलावाचे खोलीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गवळाऊ गाईच्या संवर्धनासाठी व कायम पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी दीड किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात आले. याच परिसरातील सुमारे अर्धा किलोमीटर असलेला तलाव संपूर्ण गळाने भरल्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता संपली होती. त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी जंगलात वाहून जात होते.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व या केेंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी हेटीकुंडी येथील पिण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा यासाठी जानकीदेवी बजाज संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख, जिल्हा समन्वयक विनेश काकडे यांना तलाव खोलीकरणाबाबत मागणी केली होती. संस्थेने गाईच्या संवर्धनासाठी उपयुक्त असलेले काम विनामुल्य पूर्ण करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तात्काळ कामाला सुरूवात केली. तलावातील गाळ व खोलीकरणानंतर दगड व माती काढण्यासाठी पोकलँड व तीन मोठे ट्रक यांच्या सहाय्याने सतत १३ ते १४ दिवस खोलीकरणाचे कार्य पूर्ण केले. या कामावर सुमारे ३५ लक्ष खर्च उपेक्षित होता. या खोलीकरणामधून सुमारे ३ हजार ३०० ट्रक माती व दगड काढण्यात आले आहेत. खोलीकरणानंतर तलावात जिवंत पाणी लागले आहे. गवळाऊ गायी सोबत वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा या उपक्रमामुळे सुटण्यास मदत झाली आहे.
गवळाऊ प्रजातीच्या गाईचे संवर्धन व संगोपनासाठी राज्य शासनाने १९८६ मध्ये हेटीकुंडी येथे ३२४ हेक्टर जागेवर प्रक्षेत्र निर्माण केले. या केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. गवळी समाजाने अत्यंत देखन्या गवळाऊ गोवंशाचे परंपरागत पद्धतीने संरक्षण व संवर्धन केले आहे. त्यामुळे आर्वी, कारंजा, सेलू तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात या वंशाच्या गायीचे अस्तित्व आहे. या प्रजातीच्या गायीचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे.
गवळाऊ गायवर्ग नोंदणी व विकास सहकारी संस्था स्थापन करून या संस्थेद्वारे देशी जातीच्या जनावरांचे संरक्षण व संवर्धन करण्यासंदर्भात शासकीय धोरण ठरविणे व प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली. वर्धा जिह्याचे वैभव असलेल्या गवळाऊ प्रजातीच्या संवर्धनासाठी पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले, उपायुक्त डॉ. प्रवीण तिखे, जानकी देवी बजाज संस्थेचे कर्नल विनोद देशमुख, विश्वास सोहणी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव खोलीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.(शहर प्रतिनिधी)