रुग्णवाहिका तीन, चालक एक, वाद होतात अनेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 04:26 PM2021-10-28T16:26:52+5:302021-10-28T16:43:36+5:30
प्रशासनाने तीन रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला दिल्या आहेत. मात्र, चालक एकच असल्याने दोन रुग्णवाहिका केंद्रातच उभ्या राहत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही.
वर्धा : रुग्णालय म्हटलं की रुग्णवाहिका आलीच. त्यामुळे रुग्णांची प्रकृती आरोग्य केंद्रात सावरण्यासारखी नसली तर रुग्णवाहिकांची मागणी केल्या जाते. प्रशासनाने तीन रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला दिल्या आहेत. मात्र, चालक एकच असल्याने दोन रुग्णवाहिका केंद्रातच उभ्या राहत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. परिणामी रुग्णांचा गैरसमज होऊन वादाचे प्रकार घडत आहे. त्यामुळे चालकांची भरती करण्याची मागणी केली जात आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक वर्षांपासून जननी सुरक्षा योजनेची एक रुग्णवाहिका उपलब्ध असून त्यानंतर कोरोनात नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आमदार दादाराव केचे यांनी जुलै महिन्यात अद्ययावत सोयी सुविधा युक्त रुग्णवाहिका प्रदान केली. त्यानंतर लसीकरण वाहन म्हणून नामदार नितीन राऊत यांच्यामार्फत सीएसआर अंतर्गत एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण सध्या ३ सुसज्ज रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे अकस्मात स्थितीत रुग्णांना येथून मोठ्या रुग्णालयात अत्यावश्यक उपचाराच्या दृष्टीने रेफर केले असता रुग्णवाहिकांची मागणी होणे साहजिकच आहे.
अशा स्थितीत चालक जर दुसऱ्या वाहनावर बाहेर गेला असल्यास रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णवाहिका असूनदेखील रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने वादाचे प्रसंग घडतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची चांगलीच कोंडी होत असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णवाहिकेवर किंवा आरोग्य विभागाच्या वाहनावर स्वतंत्र चालकाची नियुक्ती करणे गरजेचे आहेत.
लाखो रुपयाची वाहने उपलब्ध असताना नागरिकांना त्याचा फायदा होऊ नये, ही शोकांतिका आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देत चालकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या अनेक गावांचा परिसर मोठा असून आरोग्य केंद्रात किमान २४ गावं येत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा रुग्णांना उपलब्ध वाहनांची सोयी सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
वाहने आहेत तर त्याचा उपयोग नागरिकांना झालाच पाहिजे. अनेक ठिकाणी आमची इच्छा असूनही नागरिकांना वाहन उपलब्ध करून देता येत नाही. वाहन जरी उपलब्ध असले तरी अनेकदा अतिरिक्त चालक उपलब्ध राहत नाही. अनेक अडचणी आहेत. रुग्णांना योग्य सुविधा प्राप्त झाल्यास आम्हालाही आनंद होतो. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून उपाययोजना होणे गरजेचे आहे.
डॉ. अंजली केचे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी