एकच ध्येय, शहर होवो टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:37 PM2019-06-28T21:37:58+5:302019-06-28T21:38:20+5:30

शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.

One goal, the city should be tanker-free | एकच ध्येय, शहर होवो टँकरमुक्त

एकच ध्येय, शहर होवो टँकरमुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम : घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यावर भर देत आहे. पाणीटंचाईवर हा एकमात्र उपाय सुचवत आली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात कार्यही करीत आहे.
२०१७ ला ५ ठिकाणी करण्यात आलेल्या मोकळ्या जागेवरील जल संधारण उपक्रमातून वाढलेली पाण्याची पातळी पाहून याहीवर्षी संत तुकडोजी वॉर्ड येथील ३ ठिकाणी तर संत ज्ञानेश्वर वार्ड येथील पटवारी कॉलनीत हा उपक्रम राबविण्यात आला. ७ फुट खोलीचे खड्डे करून त्यात लहान-मोठे दगड भरण्यात आले.
लोक वर्गणीतून दगडांची तर पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने जेसीबीची व्यवस्था करण्यात आली. श्रमदानातून या खड्ड्यांमध्ये दगड टाकण्यात आले. या अभियानात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. हा उपक्रम एकाच दिवशी चार ठिकाणी राबविण्यात आला.
घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंगसाठी पर्यावरण संवर्धन प्रयत्नरत आहे. संस्थेने जनजागृतीतून पाण्याचे महत्त्व पटवून देऊन आणि नगरपालिकेला नियमांचे पालन करायला लावून अनेक घरांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग करून घेतले. यावर्षी नगरसेवक मनोज वरघणे यांच्या घरी हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी तयार केलेले संयंत्र लावण्यात आले. तसेच खड्डा करून ड्रमच्या सहाय्यानेही पाणी जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली.
नगरपालिका प्रशासन उदासीन
यावर्षी एवढा भयंकर दुष्काळ पडूनही नगरपालिका मात्र सुस्त आहे. दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर देणाऱ्या नगरपालिकेने आता टँकरचे पाणी मिळणार नाही, असे सांगून जबाबदारीपासून पळ काढलेला आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने आजपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याकररिता अनेकदा निवेदने दिली. परंतु यावर एकदाही जाणीवपूर्वक विचार करण्यात आला नाही. पाण्यासंबधी नेहमीच थातूर मातूर उपाययोजना केल्याने नदीने वेढलेल्या या शहरावर दुष्काळाशी सामना करण्याची वेळ ओढवली आहे.

Web Title: One goal, the city should be tanker-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.