नागपूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बंद टिप्परवर धडकली; एक ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 05:25 PM2022-03-17T17:25:43+5:302022-03-17T17:40:50+5:30
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली.
वडनेर (वर्धा) : बंद स्थितीत रस्त्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परवर मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी (पोहणा) गावाजवळ १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झाला.
बुधवारी रात्रीच्या सुमारास नागपूर-हैदराबाद महमार्गावरून छत्तीसगडकडे भरधाव जात असलेली ट्रॅव्हल्स (सी.जी. ०८ ए.एस. ८९४६) चालकाचा वाहनावरील ताबा सुटूल्याने रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परला (एम.एच.३४ ए.व्ही. ०९८०) जाऊन धडकली.
या अपघातात चालक जगत बहादूरसिंग (५८, रा. चांदखुरी जि. दुर्ग छत्तीसगढ) याचा जागीच मृत्यू झाला. तर ३ व्यक्ती गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती पिपरी पोहणा येथील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅव्हल्समधील नागरिकांना बाहेर काढले. जाम महामार्ग पोलीस केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांच्या मार्गदर्शनात स्नेहल राऊत, सुनील भगत, अजय बेले, प्रदीप डोंगरे, राहुल कुमरे यांनी अपघातस्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. अपघात ग्रस्त वाहन हॉयड्राच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची वडनेर पोलिसांनी नोंद घेतली आहे.
अन् नागरिकांनी केली जेवणासह राहण्याची सोय
ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या जवळपास १०० प्रवाशांची तारांबळ उडाली होती. मात्र, या अपघाताची माहिती मिळताच पिपरी पोहणा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप ट्रॅव्हल्सच्या बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. त्यानंतर मध्यरात्री सर्व प्रवाशांना अपघाताच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मायेची ऊब देत गावातील बुद्ध विहारात नेऊन पोटभर जेवण व रात्रभर राहण्याची व्यवस्था केली.