दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Published: September 14, 2015 02:07 AM2015-09-14T02:07:55+5:302015-09-14T02:07:55+5:30
येथील महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला असून शनिवारी जखमीचा मृत्यू झाला.
महामार्गावरील घटना : आजंती येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू
हिंगणघाट : येथील महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला असून शनिवारी जखमीचा मृत्यू झाला.
काशीराम श्रीवास (६१) रा. आजंती असे मृतकाचे नाव असून ते काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. ते हिंगणघाट येथून त्यांच्या आजंती येथील निवास्थानी जात असताना हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, काशीराम श्रीवास हे हिंगणघाट शहरातून आजंती येथे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील मोठा हनुमान मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या काशीनाथ यांना नागरिकांनी हिंगणघाटच्या खाजगी रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, पुतणे असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ. समीर कुनावार यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
दुचाकी धडकल्याने एक गंभीर
वर्धा : येथील आर्वी मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री घडली.
जखमीचे नाव शैलेश पांडे असे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याा अपघातात आणखी जखमी झालेल्यांची नावे शहर पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती. शहर पोलीस रात्र गस्तीवर असताना आर्वी मार्गावरील दाते मंगल कार्यालयाजवळ अपघात झाला असून बघ्यांची गर्दी झाल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी जखमींना पहिले थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. यातील पांडे याच्या डोक्याला जबर मार असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी एकाही जखमीच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात येत तक्रार केली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)