छेडखानीच्या वादात एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:47 PM2018-03-30T23:47:31+5:302018-03-30T23:47:31+5:30
युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या निरंकार कोटेक्स येथे घडली.
ऑनलाईन लोकमत
तळेगाव (श्यामजीपंत) : युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या निरंकार कोटेक्स येथे घडली. किसन भील्ल (२५) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज नवलसिंग सोळंकी (२१) रा. बसला खपरा त. नेपाळ नगर, जिल्हा बुरहानपुर (मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड आली.
पोलीस सुत्रानुसार, येथील निरंकार कोटेक्स येथे कामानिमित्त विविध भागातून मजूर येतात. यातच किसन भील्ल (२५) हा आपल्या परिवारासोबत कामानिमित्त आला होता. त्याच्या सोबत त्याचा चुलत भाऊ साहेब जहानसिंग भील्ल (२०) हा सुद्धा आला होता. तीन दिवसांपूर्वी मृतकाचा चुलत भाऊ हा सुरज सोळंकी याच्या बहिनीच्या खोलीत गेला होता. यावेळी सुरज व साहेब या दोघांत चांगलाच वाद झाला होता. हा वाद आपसी समझोत्याने निपटविण्यात आला होता.
या घटनेचा वचपा काढण्याच्या गुरुवारी रात्री सुरज सोळंकी हा किसन भील्ल याचा चुलत भाऊ साहेब याला मारहाण करीत होता. हा वाद सोडविण्याकरिता किसन मध्यस्थी करण्याकरिता गेला होता. दरम्यान मध्यस्थी करण्यास आलेल्या किसनवर सुरजने चाकुने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना अतीरक्तस्त्रावामुळे त्याचा वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरजला अटक केली. या प्रकरणी ठाणेदार भोयर, उपनिरीक्षक राठोड, निलेश पेटकर, आशिष चव्हाण, सचिन साठे तपास करीत असून यात आणखी आरोपी आहेत काय, याचा शोध सुरू आहे.