जीपच्या धडकेत एक ठार
By admin | Published: February 13, 2017 12:38 AM2017-02-13T00:38:03+5:302017-02-13T00:38:03+5:30
भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
एक गंभीर : गिरड सिर्सी मार्गावरील घटना
गिरड : भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना गिरड-सिर्सी मार्गावर रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघात होताच वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.
मधुकर धोटे (४५) रा. महालगाव, जि. नागपूर, असे मृतकाचे नाव आहे. देवचंद रायबा नागपूरे रा. नरसाळा जि. नागपूरे असे जखमीचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मधुकर व देवचंद हे दोघेही एम.एच. ४० ए.डी ६५१७ क्रमांकाच्या दुचाकीने गिरडकडे येत होते. दुचाकी जानकी तलावाजवळ आली असता भरधाव असलेल्या जीपने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीवरील मधुकर धोटे याचा जागीच मृत्यू झाला तर देवचंद नागपूरे हे गंभीर जखमी आहे.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तात्काळ रुग्णालयाकडे रवाना केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. अपघात होताच वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरून वाहन चालकाने पळ काढल्याचे माहिती होताच गिरड पोलिसांनी आपल्या हालचालिंना वेग देत नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची नाकेबंदी करून तपासणी केली. नाकेबंदी दरम्यान आरोपी वाहन चालक सतीश नवलाखे याला एम.एच. ४९ यू. ०७४० क्रमांकाच्या अपघातग्रस्त जीपसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेची गिरड पोलिसांनी नोंद घेतली असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.(वार्ताहर)