एकाच रात्री पाच घरे फोडून ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:08 AM2018-04-19T00:08:11+5:302018-04-19T00:08:11+5:30
एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या येथील उच्च शिक्षितांची वसाहत शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच व एकाच चाळीतील तब्बल चार घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या येथील उच्च शिक्षितांची वसाहत शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच व एकाच चाळीतील तब्बल चार घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला. शिवाय पाचव्या घरातून दुचाकी पळविली. चोरीच्या या पाच घटना बुधवारी उघडकीस येताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री व पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार घरे फोडून मुद्देमाल व एक दुचाकी लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले हे येथे भाड्याच्या घरात राहतात. त्यांची बदली कारंजा (घा.) येथे झाल्याने त्यांनी खोलीतील सर्व साहित्य कारंजा येथे हलविले. याच बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. यामुळे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. दुसरी चोरी दीपक वैरागडे यांच्या घरी झाली. ते वनविभाग तळेगाव येथे कार्यरत असून लग्न समारंभासाठी नातलगांकडे गेले आहे. त्यांच्याही घरावर चोरट्यांनी हात साफ केला. त्यांना दूरध्वनीवर चोरीची माहिती देण्यात आली. ते उपस्थित नसल्याने चोरीस गेलेला माल किती, हे कळू शकले नाही.
तिसरी चोरी शेख लाजीर शेख नबी यांच्या घरी झाली. ते गवंडी काम करतात. घटनेच्या रात्री ते नागपूर येथे गेल्याचे कळते. त्यांच्या घरातून ६ ग्रॅम सोने व नगदी दोन हजार रुपये चोरीस गेल्याचा अंदाज आहे. चौथी चोरी लोहकरे यांच्या घरी झाली. त्यांच्या घराचे कुलूप तोडले; पण तेथे कुणीही राहत नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी चौकशी केल्यावर तेथे महिलेच्या जुतीचे ठसे व लहान मुलांच्या पायाचे ठसे आढळले. यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहे. पाचवी चोरी पटले यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या हुकूमचंद पालीवाल यांच्या घरी झाली. ते सि-डेट कंपनीत कार्यरत आहे. हुकूमचंद घरात झोपेत असताना घराबाहेर ठेवलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. घटनांची नोंद घेत पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.