वर्धा जिल्ह्यातील एक हजार व्यक्तींची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:00 AM2020-05-18T07:00:00+5:302020-05-18T07:00:18+5:30
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा कुठल्याही परिस्थितीत उद्रेक होऊ नये या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन तब्बल १ हजार व्यक्तींची कोरोना चाचणी आता केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा कुठल्याही परिस्थितीत उद्रेक होऊ नये या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन तब्बल १ हजार व्यक्तींची कोरोना चाचणी आता केली जाणार आहे. ही विशेष चाचणी मोहीम राबविताना कोरोनाच्या हॉटपॉट असलेल्या जिल्ह्यांतून वर्धा जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींसह सर्वात जास्त नागरिकांच्या सपर्कात येणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असून त्याबाबतचे प्रभावी नियोजन सध्या जिल्हा प्रशासन करीत आहे.
वाशीम येथून उपचारासाठी वर्धा जिल्ह्यात दाखल झालेला एक रुग्ण कोेरोना पॉझिटिव्ह आल्याने सध्या त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दक्षता म्हणून कन्टेमेंट व बफर झोन तयार करून आर्वी तालुक्यातील १३ गावे सील करण्यात आली आहेत. रितसर परवानगी घेऊन सध्या मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यात नागरिक येत आहेत. हे व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे इतर जिल्ह्यांसह राज्यात अडकले होते. या व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबाला सध्या खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन केले जात असले तरी कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सूचनेवरून आता कोरोना चाचण्याच्या प्रक्रियेला गती दिल्या जाणार आहे.
सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत १०० स्वॅबची होतेय चाचणी
सेवाग्राम येथील प्रयोगशाळेला कोविड चाचणीची परवानगी मिळाली आहे. या प्रयोगशाळेत दररोज १०० स्वॅबची चाचणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून आखल्या जात असलेल्या नियोजनाला मूर्तरुप आल्यावर या प्रयोगशाळेत एक हजार स्वॅबची चाचणी केली जाणार आहे.
यांना देणार प्राधान्यक्रम
सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, नर्स, भाजीविक्रेते, औषधी विक्रेते, दुकानदार, होम क्वारंटाईन कालावधीत प्रकृती बिघडलेल्यांसह कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेले व्यक्तीं व कोरोनाचे हॉटपॉट असलेल्या क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना प्राधान्यक्रम देऊन त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
नजीकच्या रुग्णालयात घेणार स्वॅब
सदर मोहीम राबविताना प्रशिक्षण दिलेले अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने नजीकच्या शासकीय रुग्णालयात नेऊन तेथे त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेणार आहे. त्यानंतर हे स्वॅब तपासणीसाठी सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
४५ रुग्णवाहिका केल्या अधिग्रहित
वर्धा जिल्ह्यात विशेष कोरोना चाचणी मोहीम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ४५ रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. या रुग्णवाहिकांपैकी काही रुग्णवाहिका तालुक्याच्या स्थळावर देण्यात येणार आहेत. शिवाय त्याचा वापर या विशेष मोहिमेसाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यात विशेष कोरोना चाचणी मोहीम राबविण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी सध्या प्रभावी नियोजन केले जात आहे. ही मोहीम सुरू झाल्यावर दररोज एक हजार स्वॅबची तपासणी होईल.
- डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा कोविड केंद्र समन्वयक, वर्धा.