१२ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’
By admin | Published: September 21, 2015 01:57 AM2015-09-21T01:57:49+5:302015-09-21T01:57:49+5:30
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे या उत्सवावर मोठा खर्च होतो.
अन्य गावांनी घ्यावा आदर्श : नागरिकांसह संपूर्ण व्यापाऱ्यांचेही लाभते सहकार्य
सुधीर खडसे समुद्रपूर
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे या उत्सवावर मोठा खर्च होतो. यामुळेच एक गाव एक गणपती, ही संकल्पना समोर आली; पण त्यावर विशेष अंमल होताना दिसत नाही. असे असले तरी गावात मात्र एका तपापासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना रूजू आहे. यासाठीच येथील बाल गणेश उत्सव मंडळाला अनेक पुरस्कारांनीही गौरवान्वित करण्यात आले आहे.
समुद्रपूर हे तालुक्याचे गाव असून येथे बारा वर्षांपासून एक गाव, एक गणपती स्थापन होत आहे. बाल गणेश मंडळाने १९९७ मध्ये मंडळाची स्थापना केली. हे बाल गणेश मंडळाचे १९ वे वर्ष आहे. १९९७ मध्ये प्रशांत झाडे, संजय खडसे, महेंद्र झाडे, दिनेश डहाके यांच्या पुढाकाराने मातीच्या मूर्तीच्या रूपात या उत्सवाला सुरूवात करण्यात आली होती. बारा वर्षांपासून अव्याहत या गणेश मंडळाकडून गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला जात आहे. संपूर्ण गावात केवळ एकाच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येत असल्याने या मंडळाला गावातील नागरिकांसह संपूर्ण व्यापाऱ्यांचे उत्तम सहकार्य लागत आहे. यामुळेच मंडळाचीही उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे दिसून येते.
सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एक गाव एक गणपती ही संकल्पना अस्तित्वात आणली. प्रारंभी या संकल्पनेला पुरस्कारही जाहीर करण्यात आले होते. या संकल्पनेला मूर्त रूप देण्याकरिता ग्रामपंचायत समुद्रपूर यांनी २००४ मध्ये पुढाकार घेतला. तेव्हापासून आजतागायत तालुक्याचे हे गाव एक गाव एक गणपती या संकल्पनेची जोपासना करीत आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत या मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात.
यावर्षी बाल गणेश उत्सव मंडळाने मनमोहक मूर्तीची स्थापना केली आहे. या उत्सवात गावातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. तालुक्याचे स्थळ असताना एकाच गणेश मूर्तीची स्थापना होत असल्याने अन्य गावांनीही प्रेरणा घेत एक गाव एक गणपती संकल्पना राबविणे गरजेचे झाले आहे.