वणा नदीत एकाचा मृतदेह सापडला; दोघे अद्याप बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:12+5:30
वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील वणा नदीच्या पात्रात चार जण वाहून गेले होते. त्यापैकी रिया भगत हिला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात यश आले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज अभय भगत याचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला आहे. अद्यापही दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, अभय भगत याचा मृतदेह कोसारा सोईटच्या वर्धा नदी पुला पलीकडे २६ तासानंतर मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला. त्याच वेळी आपत्ती व्यवस्थापन पथक सुद्धा बोटीने पोहचले. त्यांचे सोबत आ. समीर कुणावार होते. येथील वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे असले तरी रियाची मुलगी अंजू भगत, मुलगा अभय भगत तसेच दीपाली मारोती भटे या तिघांचा शोध शर्तीचे प्रयत्न करूनही सोमवारी लागला नव्हता. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता पुन्हा नव्या जोमाने आपत्ती व्यवस्थापन पथकातील चमूने शोध मोहीम सुरू केली. सहा सदस्यांनी एका बोटीतून प्रवास करून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. या पथकाने पारडी नगाजीला दुपारी थोडा वेळ थांबा घेऊन वणा वर्धा नदीचा संगम जोड सावनगी जवळ असताना त्यांना थोड्या वेळापूर्वी एक मृतदेह वाहत गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तातडीने पुढे जात कोसारा नंतर सोईटच्या पुलाजवळ असताना त्यांचे पुढेच सदर मृतदेह आज दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आढळून आला. तो नदीपात्राबाहेर काढण्यात आला. या शोध पथकाला किशोर दिघे, आशीष परबत, अनिल गहेरवार, बाळू वानखेडे, रुपेश लाजूरकर यांनी सहकार्य केले. सायंकाळी सहा वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली. अद्यापही दोघांचे मृतदेह सापडले नसल्याने उद्या पुन्हा नव्या जोमाने शोध मोहीम राबविली जाणार आहे.