अपघात विम्याचा केवळ १८ शेतकऱ्यांना लाभ
By admin | Published: February 9, 2017 12:34 AM2017-02-09T00:34:15+5:302017-02-09T00:34:15+5:30
कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास जखमी व मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी
कृषी विभागाकडे ५३ प्रकरणे : आठ प्रस्ताव नामंजूर
महेश सायखेडे वर्धा
कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास जखमी व मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील एकूण ५३ प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी केवळ १८ प्रस्ताव विम्याच्या लाभाकरिता पात्र ठरले आहेत. आठ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले तर उर्वरित प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
देशविकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याचे कवच मिळावे, कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जिल्ह्यात कृषी विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. विम्याचा हप्ता शासनाकडून भरला जातो. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेमुळे विम्याचे कवच मिळाले आहे. पुर्वी शेतकरी अपघात विमा योजना कार्यरत होती; पण त्यातील काही उणीवा दूर करून शासनाने नुकतीच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून रस्ता/रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, विषबाधा, जनावरांचा हल्ला वा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, विजेचा धक्का, सर्पदंश, विंचू दंश, हत्या, दंगल आदीमुळे होणाऱ्या अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू वा अपंगत्व आल्यास विम्याचा आर्थिक लाभ मिळू शकतो.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात एकूण ५३ प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयाला प्राप्त झाले होते. यात वर्धा तालुक्यातील ११, सेलू ३, देवळी ७, आर्वी ५, आष्टी (शहीद) ६, कारंजा (घा.) ६, हिंगणघाट ७ आणि समुद्रपूर तालुक्यातील ८ प्रस्तावांचा समावेश होता. यापैकी वर्धा तालुक्यातील ४, सेलू १, देवळी ३, आष्टी (श.) ३, कारंजा (घा.) २, हिंगणघाट १ व समुद्रपूर तालुक्यातील ४ असे एकूण १८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. विमा कंपनीकडे वर्धा तालुक्यातील ६, सेलू २, देवळी ३, आर्वी ३, आष्टी १, कारंजा (घा.) १, हिंगणघाट ३ आणि समुद्रपूर तालुक्यातील ४ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. यातील आठ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. यात वर्धा तालुक्यातील १, देवळी १, आर्वी २, आष्टी १, कारंजा (घा.) २ तर हिंगणघाट तालुक्यातील एका प्रस्तावाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे आष्टी (श.) आणि कारंजा (घा.) तालुक्यातील प्रत्येकी एक आणि हिंगणघाट तालुक्यातील दोन प्रस्ताव अपूर्ण असल्याची नोंद घेण्यात आली आहे. संबंधितांना कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्र पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
योजनेच्या प्रचार, प्रसाराचा अभाव
शेतकरी हित साधण्याकरिता सुरू करण्यात येत असलेल्या योजनांची व्यापक प्रसिद्धी होणे गरजेचे असते; पण बहुतांश योजनांची व्यापक प्रसिद्धी होत नसल्यानेच शेतकरी योजनांचा लाभापासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे. असे असले तरी कृषी विभागाकडून गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांपर्यंंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे; पण अनेक शेतकऱ्यांना योजनेची माहिती न मिळाल्याने ते प्रस्ताव पाठवू शकत नाहीत. यामुळे पुन्हा यसा योजनेला व्यापक प्रसिद्धी देत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे गरजेचे झाले आहे.
योजनेंतर्गत मिळणारी भरपाई
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून अपघाती मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटुंबाला २ लाख रुपये, अपघातात दोन डोळे वा दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये, अपघातात एक डोळा वा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
शेतकरी हितार्थ ‘गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्यांनी आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे. शेतकऱ्यांना कुठलीही अडचणी असल्यास त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.