१०९ शाळांत केवळ ५ हजार २७५ विद्यार्थी
By admin | Published: August 21, 2016 12:32 AM2016-08-21T00:32:20+5:302016-08-21T00:32:20+5:30
ग्रामीण भागातील मुलांना गावातच शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या.
कॉन्व्हेंट संस्कृतीत वाढ : जिल्हा परिषद शाळांत पटसंख्येची घसरण
विजय माहुरे सेलू
ग्रामीण भागातील मुलांना गावातच शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळातील पटसंख्या दरवर्षी घसरत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही वर्षांत काही गावातील शाळा ओस तर पडणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
सेलू पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या एकूण १११ शाळांपैकी दोन शाळांचे विलीनीकरण करण्यात आले. यात केळझर व हमदापूर शाळेचा समावेश आहे. त्यामुळे सद्यास्थितीत १०९ शाळा असून सुरू शैक्षणिक सत्रात ५ हजार २७५ विद्यार्थी शिक्षण घेत असून यात एका ऊर्दू शाळेचा समावेश आहे. या ऊर्दू शाळेत ३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
गत ११-१२ या शैक्षणिक सत्रात ५ हजार ९८५ विद्यार्थी होते. त्या तुलनेत पाच वर्षात ७१० विद्यार्थी संख्या सद्यास्थितीत कमी झाली आहे. तर १०९ पैकी सात शाळांमध्ये पटसंख्या १० पेक्षा कमी आहे. या ७ शाळामध्ये ४४ विद्यार्थी पटसंख्या असून या ४४ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी १४ शिक्षक आहेत. तालुक्यात असलेल्या उच्च श्रेणी प्राथमिक शाळा नव्या नियमानुसार प्राथमिकच झाल्या आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांच्या सुसज्ज इमारती क्रीडांगण सुविधा, मधान्ह भोजन, विद्यार्थ्यांना गणवेश आदी सुविधा आहे. गावातच शिक्षणाची सुविधा असताना कॉन्व्हेंट संस्कृतीचा पगडा पालकांच्या मनावर घट्ट बसला आहे. गावखेड्यात कॉन्व्हेंटच्या स्कूल बसेस पोहचल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचाही कल बदलला आहे. याच जिल्हा परिषद शाळामधून शिक्षण घेवून चांगले विद्यार्थी घडले ते उच्च पदस्थ ठिकाणी कार्यरत आहे. राजकारण, समाजकारण यातही पुढे आहे. अशा शाळाकडे बदलत्या परिस्थितीत पाठ फिरवावी ही चिंतणीय बाब आहे.