‘धाम’ मध्ये केवळ ८.३८ दलघमी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:17 PM2019-04-03T23:17:18+5:302019-04-03T23:18:39+5:30

पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले.

Only '8.38' Dalghami water left in 'Dham' | ‘धाम’ मध्ये केवळ ८.३८ दलघमी पाणी शिल्लक

‘धाम’ मध्ये केवळ ८.३८ दलघमी पाणी शिल्लक

Next
ठळक मुद्देजलसंकट गडद : साडेतीन महिने पाणी वापरावे लागेल काटकसरीनेच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, जसजसे दिवस लोटत गेले तसतसी जलाशयांमधील पाणी साठ्यात घट झाल्याने सध्या सहा दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. सध्यास्थितीत वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या धाम प्रकल्पात केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असल्याने नागरिकांनाही पुढील साडेतीन महिने पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३२८.६० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून जीवन प्राधिकरण वर्धा शहराच्या शेजारील ग्रामीण भागात तर नगर पालिका प्रशासन शहरी भागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करते. त्यामुळे धाम प्रकल्प हा वर्धा शहरासह शहराशेजारी असलेल्या सुमारे १५ गावांसाठी आधार देणाराच आहे. परंतु, मागील दोन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने हा प्रकल्प पूर्णत: भरला नाही. त्यामुळे यंदा कमालीच्या जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून पाटबंधारे विभागाकडून महिन्यातून केवळ एक वेळाच सदर जलाशयातील पाणी सोडले जात आहे. शिवाय पाण्याची उचल करणाऱ्या संस्थांना सदर विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना व गृहिणींना सहन करावा लागत आहे.
मागील वर्षी होते २४.६५ दलघमी पाणी
दिवसेंदिवस वाढत असलेली वर्धा शहर व शहराशेजारील लोकसंख्या तसेच त्यांची वाढणारी पाण्याची मागणी यामुळे भविष्यात उद्भवणारी जल समस्या लक्षात घेऊन धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचे वर्धा पाठबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने कागदोपत्री प्रक्रियाही सध्या केली जात आहे. परंतु, बड्या लोकप्रतिनिधींची उदासिनता व त्रुट्या शोधण्यात धन्यता मानत असलेल्या अधिकाऱ्यांमुळेच धाम प्रकल्पाची उंची मागील काही वर्षांपासून केवळ कागदावरच वाढत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात धाम प्रकल्पात २४.६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. परंतु, यंदा तो केवळ ८.३८ दलघमी असल्याने पाण्याचा काटकसरीनेच वापर गरजेचा आहे.

रामनगरात होतोय
पाण्याचा अपव्यय
रामनगर परिसरातील पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महावीर बगीचात जलकुंभ आहे. परंतु, त्यापैकी एक जलकुंभातून सतत पाण्याची गळती होत आहे. सदर जलकुंभाची वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याने दररोज येथे शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
न.प.कडून टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरू
सदर जलसंकटावर मात करण्यासाठी वर्धा न.प.ने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. सध्या पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करता यावा या अनुषंगाने काही खासगी टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवाय सदर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी व्हावी यासाठीही अधिकाºयांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

Web Title: Only '8.38' Dalghami water left in 'Dham'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी