९६ वर्षांपासून ‘त्या’ दोन गावांत एकच गणपती
By admin | Published: September 10, 2016 12:34 AM2016-09-10T00:34:33+5:302016-09-10T00:34:33+5:30
गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना एकीकडे रूजत असताना वर्धा तालुक्यातील कुरझडी व जामठा या दोन गावांत
एक पाऊल पुढे : कुरझडी-जामठा गावात सलोखा राखणारा गणेशोत्सव
गौरव देशमुख वर्धा
गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना एकीकडे रूजत असताना वर्धा तालुक्यातील कुरझडी व जामठा या दोन गावांत मात्र मागील ९६ वर्षांपासून एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली जात आहे. ग्रामीण भागात हा कुतुहलाचा विषय बनला असून एक पाऊल पूढे असलेला गणेशोत्सव आदर्शवत ठरत आहे.
दिवसेंदिवस शहरासह गावांत गल्लोगल्ली गणेश मंडळांची स्थापना होऊ लागली आहे. यामुळे लोकांचा हा उत्सव सध्या प्रशासकीय यंत्रणेला डोळ्यात तेल घालून पार पाडावा लागत आहे. तंटे टाळून गावात एकोपा राहावा म्हणून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रूजत आहे; पण वर्धा तालुक्यात तीन हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या कुरझडी व जामठा या दोन गावांनी गणेशोत्सवात एक पाऊल पुढे ठेवले आहे. दोन्ही गावांतील ग्रामस्थ हा उत्सव एकात्मतेचे दर्शन घडवित गुण्या गोविंदाने साजरा करतात. यात जगन्नाथ तळवेकर, तुकाराम तळवेकर, व्यंकटराव जाधव, पांडुबा चौधरी, आबाजी तळवेकर, जयराम तळवेकर, किसना माहेश्वरी, माधव बोकडे, माणिक तळवेकर, भानुदास चौधरी, गणपत जाधव, तानबाजी पांडे सहकार्य करीत आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी ते स्वत: लक्ष देतात.
यावर्षी गावातील रस्त्यांवर वृक्ष लागवड करीत सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात आले आहे. गावातील ग्रामपंचायतीचे सहकार्य घेत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. शिवाय विविध विषयावरील जनजागृतीचे उपक्रमही राबविले जात आहेत.