नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम, सुजाण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:56 PM2018-12-24T22:56:03+5:302018-12-24T22:56:34+5:30
वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, जगातील महान व्यक्तिमत्व घडले ते वाचनामुळे घडलेले आहे, नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, जगातील महान व्यक्तिमत्व घडले ते वाचनामुळे घडलेले आहे, नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील २१ वाचनालयाला ५० हजार रुपये किमतीचे ग्रंथ वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, कोषागार अधिकारी सुरज बारापात्रे, सुधीर गवळी, हर्षबोधी, यु.पी. नाले, मधुकर रोडे उपस्थित होते. पुढे बोलताना खा. रामदास तडस म्हणाले की, आज माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती मिळत असली तरी प्राथमिक पातळीवर प्रत्येक गावात ग्रंथालय पाहिजे. आज देशात अनेक कुटुंबांना ग्रंथालये माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. वाचनाने माणसाला शहाणपण येते, कारण तुमच्या जीवनाची चेतना टिकवून ठेवण्यासाठी माहिती, ज्ञान आणि स्वातंत्र्याची दृष्टी देणाऱ्या पुस्तकांनी जीवनाचे परिवर्तन होते, समृद्ध मराठीची वाचन चळवळ रुजवायची असेल, तर असंख्य पुस्तके असलेल्या ग्रंथालयांचे रूपांतर वाचनालयात व्हायला हवे, ज्ञानेश्वर, तुकाराम, कुसुमाग्रजांसारख्या अनंत साहित्यिकांनी मराठी भाषेची परंपरा समृद्ध ठेवली आहे. हा वारसा असाच प्रवाहित ठेवायचा असेल, तर वाचन संस्कृतीला पर्याय नाही, असेही ते म्हणाले. जनता वाचनालय तळेगाव, महात्मा गांधी वाचनालय कारंजा, मित्रमिलन सार्वजनिक वाचनालय नारा, प्रेरणा वाचनालय इसापूर, सार्वजनिक ग्रामपंचायत वाचनालय शिरपूर, संत गाडगेबाबा वाचनालय भिडी, मोतीलाल कपूर वाचनालय देवळी, समता ग्रामीण वाचनालय पळसगाव, कै. दाजीबा सेलूकर वाचनालय इंझापूर, विदर्भ ग्रामीण वाचनालय सावंगी (मेघे), ग्रामीण वाचनालय साईनगर, जय दुर्गा माता वाचनालय भूगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालय चितोडा, संत कबीर वाचनालय कुरझडी, स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर वाचनालय हिरापूर, सार्वजनिक वाचनालय सालोड, त्रिमूर्ती वाचनालय बोरगाव (मेघे), सिद्धार्थ वाचनालय आर्वी, सार्वजनिक ग्रामीण वाचनालय सेवाकुंज घुबगाव, अब्दुल हमीद वाचनालय वर्धा, शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय बोरगाव (मेघे) या वाचनालयाला पुस्तक दिले.