विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प टाकरखेडला

By admin | Published: May 8, 2014 02:12 AM2014-05-08T02:12:39+5:302014-05-08T02:12:39+5:30

श्री संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बायोगॅस प्रकल्प निर्माण केला. आज या प्रकल्पामुळे इंधनाच्या बचतीसह झाडांची कत्तल थांबली

The only biogas project in Vidarbha is Tarkarkhed | विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प टाकरखेडला

विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प टाकरखेडला

Next

धूपबत्ती, गांडूळ खत निर्मिती

विद्युतचीही होते निर्मिती : लहानुजी महाराज संस्थानचा उपक्रम

संजय देशमुख■ टाकरखेड
श्री संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बायोगॅस प्रकल्प निर्माण केला. आज या प्रकल्पामुळे इंधनाच्या बचतीसह झाडांची कत्तल थांबली व स्वयंपाक शिजविण्याचा प्रश्न मिटला. सोबतच विद्युत भारनियमनावर मात करण्यासाठी वीज निर्मितीही करण्यात आली. हा प्रकल्प विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प म्हणून उदयास आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
या संस्थानमध्ये ११ हजार अन्नदाते आणि दररोज ५00 ते ६00 भाविक महाप्रसादाचा घेतात. यामुळे प्रत्येक महिन्यात तीन टन इंधन लागत होते. पर्यायाने ३ टन झाडांची कत्तल होत होती. यासाठी १८ हजार रुपये खर्च करावे लागत होते. संस्थानकडे गोरक्षण असून २५0 जनावरे आहेत. सरासरी ५ किलो आणि दररोज १२00 किलो शेण मिळते. याचा विचार करून गोबरगॅस संकल्पना राबविली जाऊ शकते, ही बाब संस्थानच्या संचालकांना लक्षात आली. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अहमदनगरचे जि.प. उपकार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांच्या मार्गदर्शनात १0५ घनमीटरचा एक प्लॉट न करता भविष्यात उपलब्ध होणारे कमी-अधिक शेण याचा विचार करून ३५ घनमीटरचे तीन प्लांट तयार करण्यात आले. शेण व पाण्याचे मिश्रण करण्यासाठी यंत्राचा उपयोग केला आहे. निर्माण झालेली गॅस शुद्ध करून एका बलूनमध्ये भरली जाते. ही गॅस स्वयंपाकगृहात पाठवून त्यापासून दररोज ६00 लोकांचा स्वयंपाक होतो. यात वर्षाला २ लाख १६ हजार रुपयांची बचत होत असून झाडाची कटाई थांबली.
गॅसवर चालणारे जनरेटर बसवून १५ किलो वॅट विद्युत निर्माण करण्यात येते. यावर दररोज पाण्यासाठी लागणारा ५ हार्सपावरचा पंप दोन तास चालविला जातो. भारनियमन काळात संस्थानला लागणारी पूर्ण वीज यातून मिळते. अपारंपारिक स्त्रोत निर्माण करून आर्थिक बचतीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य संस्थानने यशस्वी केले. शिवाय लग्नप्रसंगी वाया जाणारे अन्न व भाज्यांचे अवशेषही यात वापरले जातात. प्रकल्पातून निघणार्‍या परिपूर्ण खतापासून विविध वस्तूही तयार केल्या जातात. हा उपक्रम पाहून भारतातील पहिल्या हरितक्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांनी संस्थानला भेट दिली. संस्थानमध्ये त्यांच्या संस्थेची भारतातील पहिली शेतकरी प्रशिक्षण शाळा चालू करण्यात आली. यात शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकासह शेतीबाबत तज्ज्ञांद्वारे विनामूल्य मार्गदर्शन केले आहे.

■ या प्रकल्पातून निघणार्‍या परिपूर्ण खतापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. यात गांडूळ खत, गांडूळ पाणी, धूपबत्ती, मच्छर अगरबत्ती यांचा समावेश आहे. या खताचा उपयोग संस्थानच्या शेतीत करून १00 टक्के रसायनमुक्त करण्याचा मानस आहे.

Web Title: The only biogas project in Vidarbha is Tarkarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.