अवघ्या दीड वर्षातच रस्त्याला भेगा
By admin | Published: March 6, 2017 01:07 AM2017-03-06T01:07:19+5:302017-03-06T01:07:19+5:30
येथे दीड वर्षापूर्वी २ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहे. यामुळे रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दर्जावर प्रश्नचिन्ह : ग्रामस्थांच्या तक्रारीकडे केले दुर्लक्ष
घोराड : येथे दीड वर्षापूर्वी २ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहे. यामुळे रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्याच्या बांधकामावर खर्च झालेला निधी व्यर्थ गेल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. हिंगणी रोड ते वरटकर यांच्या घराकडील रस्त्याच्या बांधकामासाठी २५-१५ च्या निधीतून २ लक्ष रूपये प्राप्त झाले. या रस्त्याचे काम ज्यावेळेस सुरू करण्यात आले होते, तेव्हाच निकृष्ट काम होत असल्याची ओरड करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अवघ्या १८ महिन्यांच्या कालावधीत रस्त्याला भेगा पडल्या.
या रस्त्याच्या मधोमध पडलेली मोठी भेग पाहता हा रस्ता काही दिवसात फुटेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या कंत्राटदाराने या रस्त्याचे काम केले त्या कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडूजी करून घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर)
चौकशीची मागणी
तालुक्यात विकासकामे सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सदर रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दर्जाकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रार केली; मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.
रस्ता बांधकाम सुरू असताना येथे संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असते; पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अल्पावधीत रस्त्याची क्षती झाली.
रस्ता बांधकामात खर्च झालेला निधी व्यर्थ ठरला आहे. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.
सदर बांधकामाची चौकशी करुन यात दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.