प्रसन्नचित्त होऊन जगणे हेच आनंदी जगण्याचे सूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:40 PM2018-02-21T23:40:25+5:302018-02-21T23:41:01+5:30
प्रत्येक जीवाच्या ठायी सहजता येणे म्हणजेच खरा आनंद आहे. संसारी आणि पारमार्थिक जीवनाचे यश हे प्रसन्न चित्त होऊन सुहास्य वदनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यातच आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : प्रत्येक जीवाच्या ठायी सहजता येणे म्हणजेच खरा आनंद आहे. संसारी आणि पारमार्थिक जीवनाचे यश हे प्रसन्न चित्त होऊन सुहास्य वदनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यातच आहे. जीवनात द्वैताकडून अद्वैतापर्यंतचा प्रवास हा मनाची प्रसन्नता, शांतभाव, मौन आणि भावशुद्धीतूनच पूर्ण केला जातो, असे सूत्र दामोदर रामदासी यांनी सांगितले.
विवेकानंद केंद्र आणि स्वामी मुक्तानंद योग महाविद्यालयामार्फत ‘आनंदी जगण्याची कला आणि वेदांत’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेची सुरूवात दीप प्रज्वलन व पुष्पार्पण करून झाली. प्रार्थना व स्वागत गीत सादर करण्यात आले. अतिथी म्हणून म. गांधी हिंदी विद्यापीठाचे डॉ. अन्वर सिद्दीकी, प्रा.डॉ. शेषराव बावणकर, प्रमोद बोरकर, विनोद आगलेकर उपस्थित होते.
रामदासी पूढे म्हणाले की, जीवनात कोणत्याही परिस्थितीत लवचिकता दीर्घकाळ टिकते. यामुळे उत्साह, प्रेम, प्रसन्नता यांच्या माध्यमातूनच लौकिक जीवन सहज आणि आनंदी करता येईल. सोबतच प्राप्त परिस्थिती व व्यक्तीचा आहे त्या स्थितीत स्वीकार करायला सुरुवात करावी, म्हणजे वाट्याला आलेले दु:खही दु:ख वाटणार नाही. आपल्या वृत्तीत हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणले की जगात कोणत्याही परिस्थितीत द्वेष, हेवा, दु:ख स्पर्श करणार नाही. वेदांत हा सर्वात विद्रोही आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी आधार आहे, हे वेदांताच्या अध्ययनातून स्पष्ट होते. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांनी शिव भावे जीव सेवा या सूत्राचा स्वीकार केला. प्रेमाची व्यापक संकल्पना आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे देखील वेदांत विचारात आहेत, असा उल्लेख अभ्यासपूर्ण विवेचनात रामदासी यांनी केला. भगवतगीता हा केवळ धर्मग्रंथ न समजता मानवी मानसशास्त्र अध्ययनाचा प्रभावी आणि मार्गदर्शक ग्रंथ आहे. आनंद या शब्दाला विरूद्ध अर्थाचा शब्दच अस्तित्वात नाही. हेच आनंदाच्या अक्षयतेचे विशेष आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. जीवनाचा प्रवास हा उजेडातून उजेडाकडेच असावा, या सूचक सल्ल्याने कार्यशाळा पार पडली.
प्रास्ताविक विनोद आगलेकर यांनी केले. प्रमोद बोरकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ सिद्दीकी यांनी याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. बावणकर यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन रामदासी यांचा केंद्रामार्फत सत्कार केला. कार्यशाळेच्या शेवटी शांतीपाठ घेण्यात आला.
यावेळी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते, स्वामी मुक्तानंद योग महा.चे विद्यार्थी, निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले तर आभार धर्मेंद्र पवार यांनी मानले. कार्यशाळेला विनोद आगलेकर, प्रमोद बोरकर, अनंत बोबडे, धर्मेंद्र पवार, आनंद मधुपवार, शुभम उमाटे व युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.