युद्धाभिमुख राजकारणाला गांधी जिल्ह्याचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:31 AM2019-02-21T00:31:44+5:302019-02-21T00:32:09+5:30
पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभा घेण्यात आली. देशाचे राजकारण ज्याप्रकारे सैनिकीकरणाच्या दिशेने जाते आहे ते धोकादायक असून युद्धज्वर पेटवण्याच्या उन्मादी राजकारणाला आम्ही ठाम विरोध करतो, अशी स्पष्ट भूमिका या संघटनांनी घेतली.
या सभेत सर्वच प्रकारच्या दहशतवादी कृतीचा तीव्र निषेध करीत असल्याची भावना व्यक्त करतानाच दहशतवादाविरोधात सर्व देश एकत्रित उभा राहण्याची गरज असल्याची भूमिका मांडण्यात आली. पुलवामा भीषण हल्ल्यासाठी जबाबदार घटकांना सूडबुद्धीने नव्हे तर शांतबुद्धीने शिक्षा झालीच पाहिजे, मात्र निष्पापांचे रक्त न सांडता या गंभीर प्रश्नाचे समाधान शोधायला हवे. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहिदांच्या बलिदानाचे राजकारण करत सांप्रदायिक तेढ निर्माण करणे, अन्य राज्यांत राहणाऱ्या काश्मिरी जनतेवर हल्ले करणे, असे प्रकार काही भागात सुरु झाले असून ते दहशतवाद्यांच्या पत्थ्यावर पडणारेच आहे. द्वेषभावनेने व प्रांतवादाने ग्रस्त हल्ले थांबवायला हवेत, मात्र युद्ध हा त्यासाठी पर्याय नसावा, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दहशतवादी प्रवृत्तींना सदबुद्धी यावी, जगभरातील नरसंहार टाळावा आणि देशातील विविध धर्म व प्रांतातील लोकांमध्ये बंधुभाव नांदावा, यासाठी यावेळी सर्वधर्म समभाव प्रार्थना आणि विश्व शांतिपाठाचे सामूहिक स्वरात पठण करण्यात आले.
या प्रार्थना सभेत आंबेडकरी चळवळीतील विचारवंत प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे, मगन संग्रहालय समितीच्या डॉ. विभा गुप्ता, आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, नई तालीम समितीच्या सुषमा शर्मा, ग्राम सेवा मंडळाच्या ओजस सु. वि. यांनी प्रारंभी भूमिका स्पष्ट केली. प्रशांत नागोसे यांनी यावेळी गीते सादर केली. सभेला करुणा फुटाणे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, अध्ययन भारतीचे हरीश इथापे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, प्रा. किशोर वानखडे, मुरलीधर बेलखोडे, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, सेवा संघाचे रवींद्र कडू, बहार नेचर फाउंडेशनचे राहुल वकारे, फूटपाथ स्कूलचे मोहित सहारे, मालती, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रीती जोशी, सिद्धेश्वर उमरकर, सुधाकर कुमरे, आनंद निकेतनचे पंडित चांनोळे, मनोज ठाकरे, दिनेश प्रसाद, गणेश बोरकर, मंगला नागोसे, प्रफुल्ल नागोसे, ज्योती माकनवार, संदीप माकनवार, सतीश साम्रतवर, विजय डगवार, अंकित बारंगे उपस्थित होते.